भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचे उद्या, मंगळवारी नागपुरात एक दिवसासाठी आगमन होत असून अमरावती मार्गावरील सुराबर्डीतील आलिशान लाऊंजमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बंदद्वार बैठक घेणार आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस संघटन बळकट करण्यासाठी राहुल गांधींचा दौरा राहणार असून या बैठकीसाठी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश नाकारण्यात आला आहे. राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे विदर्भातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांच्या जंगी स्वागताची तयारी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय उपाध्यक्ष या नात्याने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीत काँग्रेसच्या महाराष्ट्रातील रणनितीची दिशा निश्चित होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तळागाळातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जाणार आहे. नागपूरला २४ सप्टेंबरला राहुल गांधींचा मुक्काम राहण्याची शक्यता असली तरी याबाबत काँग्रेस सूत्रांकडून दुजोरा मिळालेला नाही. मात्र, २५ सप्टेंबरला राहुल गांधी पुण्याला रवाना होणार आहेत. राहुल गांधींचे मंगळवारी सकाळी आगमन झाल्यानंतर ते मोटारीने किंवा हेलिकॉप्टरने लगेच सुराबर्डी मिडोजकडे रवाना होतील. यादरम्यान कोणताही अन्य कार्यक्रम समाविष्ट करण्यात आलेला नाही. सुराबर्डीत हेलिपॅड तयार करण्यात आले असून हवामानाच्या स्थितीवर राहुल गांधींचे हवाई उड्डाण अवलंबून राहणार आहे.
उद्याच्या बैठकीत जिल्हा आणि ब्लॉक पातळीवरील काँग्रेसचे पदाधिकारी, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील काँग्रेसचे खासदार सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. विदर्भातील सर्व जिल्ह्य़ांमधील पदाधिकाऱ्यांशी राहुल गांधी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे खासदार प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचीही यावेळी हजेरी राहणार असली तरी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील सहभागाबद्दल निश्चितपणे सांगण्यात आलेले नाही. राहुल गांधींचा दौरा निवडणुकांच्या तयारीचा भाग असल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नाकारले. हा दौरा फक्त काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी असल्याचा दावा त्यांनी केला.
विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील सुमारे २५०० पदाधिकारी उद्याच्या बैठकीसाठी येणार असून बैठकीची संपूर्ण जबाबदारी अ.भा. काँग्रेस कार्यकारिणीचे निरीक्षक चंदन यादव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर नागपूर जिल्ह्य़ाचे चित्र राहुल गांधींपुढे उघडे पडू नये यासाठी १२ ब्लॉक अध्यक्षांची घाईगर्दीत मागच्या तारखेने नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. विदर्भातील अतिवृष्टीनंतर राहुल गांधी पहिल्यांदाच नागपुरला येत असले तरी शेतकरी वा पूरग्रस्तांना भेटण्याचा कोणताही कार्यक्रम नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा