नवी मुंबई पालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीचा सुरू असलेल्या मनमानी कारभारविरुद्ध उशिरा का होईना नवी मुंबई काँग्रेस चांगलाच आवाज उठविणार असून अनेक नागरी कामांची येत्या महिन्याभरात सोडवणूक न झाल्यास पालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. त्यामुळे राज्यातील सत्तेत सख्खे भाऊ असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी नवी मुंबईत पक्के वैरी होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. नवी मुंबईत सत्ताधारी राष्ट्रवादीला जाब विचारणारा विरोधी पक्षच शाबूत नसल्याचे चित्र अनेक वर्षांपासून निर्माण झाले आहे.
नवी मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष दशरथ भगत यांनी सोमवारी पालिका आयुक्त भास्कर वानखेडे यांची भेट घेऊन शहरातील समस्यांचा पाढा वाचला. येत्या महिन्यात या समस्यांची सोडवणूक किंवा निर्णय न घेतल्यास १० ऑक्टोबर रोजी पालिकेवर भव्य मोर्चा आणण्याचा इशारा दिला आहे. शहरात अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे. त्यात अस्वच्छता, आरोग्य, कचरा वाहतूक, रस्त्यावरील खड्डे यांसारखे प्रश्न गंभीर होत आहेत. ऑगस्ट महिन्यात शहरातील घनकचरा उचलण्याचे कंत्राट संपलेले असताना त्याच कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या कंत्राटदाराबद्दल खूप मोठय़ा प्रमाणात तक्रारी असून त्याला पालिकेने पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. अशा कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यात आली असून हे कंत्राट रद्द झाल्य़ानंतर या कामाचे केंद्रीकरण करण्यात येणार असून दोन विभागांत कंत्राटदार नेमण्यात येणार आहेत. यात सत्ताधारी पक्षातील खास मर्जीतील भाऊची वर्णी लावली जाणार असल्याचे समजते. या कामात ८१ प्रकल्पग्रस्त कंत्राटदार आणि त्यावर अवलंबून असणारे असंख्य कामगार आहेत. काँग्रेसने या मनमानीविरुद्ध आवाज उठविण्याचे ठरविले आहे. त्याचबरोबर शहरातील सिमेंट क्राँक्रीटचे रस्ते सोडल्यास सर्व रस्त्यावर खड्डय़ाचे साम्राज्य पसरले आहे. एमआयडीसी भागाला तर कोणी वालीच नसल्याचे चित्र आहे. परिवहन उपक्रमातील भोंगळ कारभार, पाण्याचे मीटर, जेएनआरयूएम कामांची चौकशी, माथाडी कामगारांनी गरजेपोटी बांधलेली घरे, प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्या या सारख्या विषयावर आवाज उठविण्याची गरज काँग्रेसला अनेक वर्षांनंतर वाटली आहे. शहरातील या समस्यांच्या विरोधात यापूर्वी शिवसेना, मनसे यांनीही आयुक्तांच्या भेटी घेऊन हालचाल करण्याची मागणी केली होती, मात्र नवी मुंबई पालिका प्रशासन ढिम्म असून अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता शिल्लक राहिलेली नाही असे चित्र आहे. मित्रपक्षाच्या विरोधात आवाज उठविण्याची तयारी काँग्रेसने केल्याने येत्या काळात नवी मुंबईत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा