नवी मुंबईत वीस वर्षांनंतर पािलकेत प्रथमच अधिकृतरीत्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करण्याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या डोक्यावर सत्ता स्थापनेची लटकणारी टांगती तलवार दूर झाली आहे. त्यामुळे पाच अपक्षांच्या जोडीने पाच वर्षांची पालिकेतील सत्ता चालविणे कठीण असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जीव अखेर भांडय़ात पडला आहे. आघाडी जरी झाली असली तरी काँग्रेसचे काही नगरसेवक काही कारणास्तव शिवसेना-भाजपबरोबर हातमिळवणी करण्यासही मागे पुढे पाहणारे नाहीत. त्यामुळे सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसला काही वेळा माघार घेण्याची वेळ येणार आहे.
नवी मुंबई पालिकेच्या पार पडलेल्या पाचव्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मतदारांनी काठावर पास केले. त्यामुळे सत्तेसाठी आवश्यक असलेल्या बहुमतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला पाच जागांची आवश्यकता होती.
राष्ट्रवादी काँग्रेसला ५२ जागा मिळाल्याने बहुमतासाठी त्यांना पाच नगरसेवकांसाठी अपक्षांची मनधरणी करण्याची वेळ आली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सहजासहजी सत्ता न देण्याचा चंग युतीतील शिवसेना या घटक पक्षाने बांधला होता. त्यामुळे पाच अपक्षांची मोट बांधून ती आपल्या अंगणात ठेवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने जोखीम नको म्हणून काँग्रेसबरोबर बोलणी सुरू केली होती. त्याला यश येऊन काँग्रेसने पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे. त्या बदल्यात काँग्रेसला दोन उपमहापौरपद व आठ जणांना विशेष समित्यांचे सभापतीपद देण्याचा सौदा निश्चित झाला आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते रमाकांत म्हात्रे व दशरथ भगत यांनी या तडजोडीला होकार दिला असून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर दगाफटका न करण्याचा शब्द वरिष्ठांना दिला आहे.
काँग्रेसच्या नऊ महिला व एक पुरुष नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे सभागृहात महापौरांना साथ देणारे उपमहापौरपदासाठी कोण, याचा शोध सुरू आहे. म्हात्रे यांच्या पत्नी मंदाकिनी यांना हे पद मिळावे यासाठी म्हात्रे लॉबी आग्रही आहे, तर एकाच घरातील तीन नगरसेवकांना निवडून आणणाऱ्या अध्यक्ष दशरथ भगत यांच्या घरात हे पद यावे यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. भगत यांचे गॉडफादर माजी महापौर अनिल कौशिक यांनी नुकतीच नाईक यांची भेट घेऊन सत्ता सोपानातील कौशिक गटाचे स्थान स्पष्ट केले आहे.
काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी आघाडी केली असली तरी स्थानिक पातळीवरील दुफळी आजही कायम असून म्हात्रे व भगत गट त्यासाठी सक्रिय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौरपदाची निवडणूक निर्विवादपणे पार पडणार असली तरी संशयाचे दाट धुके कायम राहणार आहे. त्यात सभागृहात भक्कम बाजू मांडणारे व वेळप्रसंगी आदळआपट करणारे शिवसेनेचे विजय चौगुले, एम. के. मढवी, नामदेव भगत आणि शिवराम पाटील ही चौकडी राष्ट्रवादी काँग्रेसला नामोहरम करणार आहे. यापैकी काही जण अपक्ष व काँग्रेस नगरसेवक फोडण्यासाठी दारोदार फिरत होते. काही जणांनी तर सिडको व स्वीकृत नगरसवेकांची खैरात वाटून मोकळे झाले होते.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमुळे अपक्षांचा वधारलेला दोन कोटींचा भाव एका क्षणात खाली उतरला आहे. अपक्षांच्या जिवावर सिडको अध्यक्ष, संचालक आणि स्वीकृत नगरसेवक होण्याची स्वप्न पाहणारे त्यांचे स्वयंघोषित नेते जमिनीवर आले आहेत. या आघाडीमुळे एका दगडात अनेक पक्षी मारण्यास राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले असून मातोश्रीवर सत्ता स्थापणेचा विडा उचलेल्या शिंदेशाहीला चाप बसला आहे. शिंदे, नाहटा जोडीने मातोश्रीवर ७० जागांवर युती निवडून येईल, अशी ग्वाही दिल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकाला वांद्रय़ात गाडला आता दुसऱ्याला गाडायला नवी मुंबईत आला आहे अशी आक्रमक भाषा वापरली. त्याला त्याच आक्रमकपणे गणेश नाईक यांनी कोण कोणाला गाडतो ते २३ एप्रिलला कळेल असे उत्तर दिले होते. निकालानंतर उद्धव ठाकरे यांना नामुष्की पत्करावी लागल्याने ते एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज आहेत.
नाईक यांना गाडण्याची भाषा करणाऱ्या ठाकरे यांना शिंदे, नाहटा यांच्यामुळे ही नामुष्की स्वीकारावी लागल्याची चर्चा मातोश्रीवर झाली. शिवसेना सोडल्यानंतरही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना यांच्याबद्दल एक अवाक्षर न काढणाऱ्या नाईक यांना इतका प्रतिकार करताना पहिल्यांदाच मातोश्रीने पाहिले. शिवसेना आणि बाळासाहेब यांचे वाभाडे काढणाऱ्यांबरोबर माझी तुलना करू नका आणि मी शिवसेना सोडली नाही, मला काढण्यात आले होते हे विसरू नका, असा निरोप नाईक यांनी मातोश्रीला दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा