* यवतमाळ विधानसभा पोटनिवडणूक
वीज भारनियमन, शेतमालाला अत्यल्प भाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यासारख्या असंख्य प्रश्नांना काँग्रेस-राकाँ आघाडीचे सरकार जबाबदार असून या सरकारने देशाचा व राज्याचा बट्टय़ाबोळ केल्याचा आरोप भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी येथे केला आहे.
जनतेने आपल्या हक्काविषयी जागृत होऊन या सरकारला सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत जनता जागरूक होणार नाही तोपर्यंत राज्याची आणि देशाची स्थिती बदलणार नाही, असे प्रतिपादन करून भाजपच्या उमेदवाराला विधानसभा पोटनिवडणुकीत निवडून देण्याचे आवाहन भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी येथे केले. काँग्रेस आमदार नीलेश पारवेकर यांचे २७ जानेवारीला अपघाती निधन झाल्यामुळे यवतमाळ विधानसभा मतदार संघात २ जूनला पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसने नीलेश पारवेकरांच्या पत्नी नंदिनी यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपाने माजी आमदार मदन येरावार यांना लढवले आहे. मदन येरावार यांच्या निवडणूक प्रचारासाठी नितीन गडकरी येथे आले होते. त्यानिमित्त अवधुतवाडी मदानाच्या प्रांगणात आयोजित प्रचार सभेत बोलताना जनतेने जातीपातीचा विचार न करता राष्ट्रहित लक्षात घेऊन भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार क्षेत्रातील कार्यकत्रे बाबासाहेब गाडे पाटील आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी भाजपात यावेळी प्रवेश घेतला. शेतकऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काही केले नाही. या पक्षात स्वाभिमानी माणसाची कदर नाही आणि भविष्यही नाही, हे लक्षात घेऊन आपण शेतकरी हितासाठी भाजपात प्रवेश घेत असल्याचे बाबासाहेब गाडे पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी मंचावर भाजप उमेदवार मदन येरावार, माजी आमदार दिवाकर पांडे, माजी खासदार राजाभाऊ ठाकरे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजू डांगे, माजी अध्यक्ष विजय पोटेचा, माजी आमदार संदीप धुर्वे, माजी आमदार उत्तम इंगळे इत्यादी नेते हजर होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा