गेली १४ वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत एकत्र असले तरी प्रत्येक ठिकाणी आपले अस्तित्व वेगळे ठेवण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न असतो. आता मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनांच्या वाटपातही हा सवतासुभा कायम ठेवल्याचे दिसते. नव्याने दुरूस्त करण्यात आलेल्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यांवरील दालनांचे मंत्र्यांना पक्षनिहाय व मजलानिहाय वाटप करण्यात आले आहे.  
गेल्या वर्षी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमधील तीन मजले आगीत जळून खाक झाले. जळालेल्या चौथ्या, पाचव्या व सहाव्या मजल्यावरील विविध विभागांची कार्यालये इतरत्र हलविण्यात आली होती.
दुरुस्तीचे हे काम आता पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी या मजल्यांवरील मंत्री व राज्यमंत्र्यांची कार्यालये चौथ्या, पाचव्या व सहाव्या मजल्यावर स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. त्यानुसार मुख्य इमारतीच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे दालन व कार्यालय असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनासाठी व कार्यालयासाठी याच मजल्यावर जागा देण्यात आली आहे. विस्तारीत सहाव्या मजल्यावर महिला व बालविकास मंत्री वर्षां गायकवाड यांना दालन देण्यात आले आहे.  सहाव्या मजल्याचा अपवाद वगळता पाचव्या व चौथ्या मजल्यावर मात्र पक्षनिहाय मंत्र्यांना दालने देण्यात आली आहेत. पाचव्या मजल्यावर सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, कृषी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी या काँग्रेस मंत्र्यांची दालने असतील. तर चौथ्या मजल्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक उपक्रम मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना चौथ्या मजल्यावर जागा देण्यात आली आहे. सध्या एका मजल्यावर दोन्ही काँग्रेसच्या मंत्र्यांची दालने आहेत. नव्या रचनेत मात्र एका मजल्यावर एकाच पक्षाचे मंत्री अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

Story img Loader