जिल्ह्यातील गठीत केलेल्या विविध सहा जिल्हास्तरीय, तसेच सोनपेठ तालुक्यातील तीन शासकीय समित्यांना मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी स्थगिती दिल्यानंतर शुक्रवारी पालकमंत्र्यांनी सर्वच जिल्हा व तालुका समित्यांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा काँगेस व राष्ट्रवादीतील कुरघोडीचे राजकारण समोर आले आहे.
सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर फौजिया खान व प्रकाश सोळंके यांच्याकडे जवळपास ४ वष्रे पालकमंत्रिपदाचा भार होता. या कार्यकाळात कोणत्याही समित्या गठीत झाल्या नाहीत. समित्या गठीत न होण्यामागे काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांतील मतभेदच कारण होते. दोन्ही पक्षांत समन्वय नसल्याने समित्या गठीत न झाल्याने दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. वेगवेगळ्या समित्यांवर वर्णी लावून अशा कार्यकर्त्यांना संधी दिली जाते. ही संधीच या निमित्ताने नाकारली गेली. सर्व जिल्हा व सोनपेठ तालुका समित्यांना स्थगिती देण्याची विनंती आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी गेल्या ३० ऑक्टोबरला केली होती. समित्यांचे गठण करताना जिल्हाध्यक्षांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. संपर्कमंत्री व लोकप्रतिनिधी म्हणून आपणासह आमदार सीताराम घनदाट यांचेही मत घेतले नाही, असे बोर्डीकरांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते.
बोर्डीकर यांच्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सर्व समित्यांना पुढील आदेशापर्यंत स्थगितीचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री कार्यालयातून तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले. दरम्यान, पालकमंत्री सुरेश धस यांनी सर्वच जिल्हा व तालुकास्तरीय समित्यांना स्थगिती दिली. धस यांच्या आदेशाचे शुक्रवारी येथे समजले. दोन्ही काँग्रेसमध्ये चालू असलेला हा कलगीतुरा कार्यकर्त्यांच्या मुळावर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा