लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी विविध समाजाचे मेळावे आयोजित करण्यावर भर दिला आहे. भाजपाच्या मुस्लिम समाजाच्या मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद बघता आता काँग्रेसनेही मुस्लिम समाजाची मते मिळविण्यासाठी १३ मार्चला मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने भाजपा आणि काँग्रेसमध्ये आता रस्सीखेच सुरू झाली आहे. दोन्ही पक्षाच्या वतीने मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भारतीय जनता पक्षाने नुकताच मुस्लिम समाजाचा मेळावा आयोजित केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने १३ मार्चला चिटणीस पार्कवर कौमी यकजहती (एकता) संमेलन आयोजित केले आहे. भारतीय जनता पक्षातर्फे नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ चिटणीस पार्कवर भाजपाचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य शहनवाज हुसेन आणि नजमा हेपतुल्ला यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मोठय़ा संख्येने मुस्लिम बांधव सहभागी होते. गेल्या काही वर्षांत विधानसभा असो की, लोकसभा निवडणुका असो, भाजपकडे मुस्लिम समाजाची फारशी वळली नाही आणि ही मते निर्णायक असतात. भाजपा मुस्लिमविरोधी असल्याची प्रतिमा काँग्रेस आणि इतर पक्षांकडून आजपर्यंत करण्यात आल्यानंतर गडकरी यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या या भाजपाच्या सभेला मुस्लिम समाजाने दिलेला पाठिंबा बघता काँग्रेस नेत्यांचे धाबे दणाणाले. त्यामुळे काँग्रेसने मुस्लिम समाजाचा मेळावा आयोजित केला आहे. १३ डिसेंबरला दुपारी ४ वाजता चिटणीस पार्कवर हा मेळावा होत असून या मेळाव्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, अल्पसंख्याक मंत्री डॉ. के.ए. रहेमान, मो. आरिफ खान, खासदार हुसैन दलवाई, प्रसिद्ध सिने दिग्दर्शक महेश भट आणि माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अझरुद्दीन उपस्थित राहणार आहे.
मुस्लिम समाजाचा काँग्रेसच्या एक गट मुत्तेमवार यांच्या विरोधात आहे. माजी मंत्री अनिस अहमद यांची नाराजी गेल्या अनेक दिवसांपासून असून ते मुत्तेमवारांच्या सभांना किंवा बैठकीला उपस्थित राहत नाहीत. काँग्रेसने मुस्लिम समाजाचा मेळावा आयोजित केला असताना त्यांचे कुठेही नाव नाही. त्यामुळे अनिस अहमदचे समर्थक काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा आहे. या मेळाव्याला मुस्लिम समाजाच्या लोकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, या उद्देशाने पक्षातील काही मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली आहे. पूर्वी हा मेळावा ११ डिसेंबरला होणार होता. मात्र, तो १३ डिसेंबरला होणार आहे. मुस्लिम बहुल भागात बैठकी घेतल्या जात आहेत.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा