निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी मिळविणाऱ्या कपिल पाटील यांना प्रत्यक्ष मतदानापूर्वीच धडा शिकविण्याचा निर्धार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने केला आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बहुमत असणाऱ्या राष्ट्रवादीतर्फे अध्यक्षपद भूषवीत असणाऱ्या कपिल पाटील यांच्या विरोधात काँग्रेस आघाडीने अविश्वास ठराव दाखल केला असून त्यावर शनिवार १९ एप्रिल रोजी चर्चा होणार आहे.
बँकेचे अध्यक्षपद भूषवीत असतानाच कपिल पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपतर्फे उमेदवारी मिळवली. त्याच वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सूचना केली होती. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सहकार विभागाच्या सहनिबंधकांकडे बँकेच्या अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला. बँकेच्या कार्यकारी मंडळावर एकूण २८ सदस्य असून त्यातील २२ काँग्रेस-राष्ट्रवादीचे आहेत. त्यापैकी कपिल पाटील वगळता सर्व २१ सदस्यांनी अविश्वास ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. उर्वरित सात सदस्यांपैकी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे तीन सदस्य आहेत. लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कपिल पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होण्याची आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिल्याचे बोलले जाते. या संदर्भात वारंवार प्रयत्न करूनही कपिल पाटील यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
निवडणुकीपूर्वीच कपिल पाटील यांना राष्ट्रवादीचा ‘दे धक्का’
निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी मिळविणाऱ्या कपिल पाटील
First published on: 15-04-2014 at 06:47 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ncps slap to kapil patil