गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अकोल्यात पराभव पत्करावा लागला होता. अशा परिस्थितीत पुन्हा काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांनी ही चाचपणी केल्याची माहिती मिळाली. या चाचपणीत लहान कार्यकर्त्यांपासून ते ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वानी भारिप-बसमंशी आघाडी नको, अशी एकमुखाने मागणी केल्याची माहिती मिळाली.
लोकसभा निवडणुकीसाठी येथील चार ते पाच प्रमुख नेत्यांनी दावेदारी केल्याची माहिती मिळाली. स्वराज्य भवन या जिल्हा कार्यालयात या सर्व घडामोडी झाल्या. प्रदेश काँग्रेसकडून शालेय शिक्षणमंत्री व पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांना अकोला लोकसभा मतदार संघाची चाचपणीची जबाबदारी दिली होती. पालकमंत्र्यांनी पक्ष कार्यकर्ते व प्रमुख नेत्यांशी चर्चा करून त्यांचा अहवाल तयार करण्याचे प्रदेश काँग्रेसने स्पष्ट केले होते.
यावेळी त्यांनी स्वराज्य भवनातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या छोटेखानी सभेत पक्षाची भूमिका मांडली. त्यानंतर पालकमंत्री दर्डा यांनी एका स्वतंत्र खोलीत कार्यकर्ते व नेत्यांची वैयक्तिक बाजू जाणून घेतली. याचा अहवाल ते प्रदेश काँग्रेसकडे देणार असल्याचे समजते. अकोला लोकसभा मतदार संघासाठी अनंतराव देशमुख, बाबासाहेब धाबेकर, लक्ष्मणराव तायडे, डॉ.सुभाषचंद्र कोरपे, सुधाकर गणगणे, अजहर हुसेन यांनी दावेदारी केल्याची माहिती मिळाली. यापैकी काही नेते या बैठकीला अनुपस्थित होते, पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी व पाठिराख्यांनी त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली.
महापालिका नगरसेवकांनी पक्ष जो उमेदवार देईल त्यासाठी कामे करण्याचा निर्धार व्यक्त केला, तर विविध तालुक्यातील गटांनी त्यांच्या इच्छूक उमेदवारासाठी लॉबिंग केले. भारिप-बमसंचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी अकोल्यात आघाडी करू नये, अशी एकमुखी मागणी पक्षातील सर्वानी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. युवक, महिला, एनएसयुआय, अपंग सेल या विविध आघाडय़ांनी विशिष्ट उमेदवाराला उमेदवार म्हणून घोषित करण्याचा आग्रह धरला आहे. सर्वानी पालकमंत्र्यांना निवडणुकीच्या किमान सहा महिने अगोदर पक्षाने उमेदवार घोषित करावा, अशी माफक आशा व्यक्त केली.
काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची चाचपणी
गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अकोल्यात पराभव पत्करावा लागला होता. अशा परिस्थितीत पुन्हा काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांनी ही चाचपणी केल्याची माहिती मिळाली.
First published on: 29-01-2013 at 12:56 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress now testing members for the loksabha election