नवी मुंबई पालिका निवडणुकीला एक महिना शिल्लक राहिलेला असताना काँग्रेस पक्षाचे प्रभारी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी तिसऱ्या बंडाची तयारी सुरू केल्याने स्थानिक काँग्रेसला पुन्हा बुरे दिन आले आहेत. जबरदस्तीने नवी मुंबईतील पालिका निवडणुकीची जबाबदारी दिल्याने फारसे उत्सुक नसलेले राणे येथील निवडणुकीच्या लढाईतून माघार घेणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. नवी मुंबईवर विशेष मेहरनजर असलेले नवनिर्वाचित अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण स्वत: पालिका निवडणुकीत लक्ष घालणार आहेत.
नवी मुंबईतील काँग्रेस म्हणजे राजकीय लाथाळ्यांचा उत्तम नमुना आहे. एकमेकांसोबत राहणारे, फिरणारे स्थानिक नेते कधी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसतील याचा नेम नाही. त्यामुळे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नसलेल्या या पक्षाची अधोगती केंद्र आणि राज्यातील निवडणुकांनंतर अधिक सुरू झालेली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गवासी काँग्रेसचे दादा नेतृत्व नारायण राणे यांना नवी मुंबईतील लढाईच्या मोहिमेवर पाठविण्यात आले होते. ओसाड गावाची जहागिरी दिल्याने अगोदरच नाराज असलेल्या राणे यांनी मध्यंतरी नवी मुंबईत येऊन येथील पक्षांतर गद्दारांना दम दिला. राणे यांच्या समोर तो दम मुकाटय़ाने सहन करणाऱ्यांनी राणे यांची पाठ फिरल्यानंतर आपल्या जुन्या खुरापती पुन्हा सुरू केलेल्या आहेत. पक्ष वाढण्यापेक्षा त्याचा ऱ्हास कसा होईल असा एककलमी कार्यक्रम येथील नगरसेवक आणि नेत्यांचा आहे. त्यामुळे अगोदरच उल्हास असलेल्या या पक्षात आता फाल्गून मास आला आहे. पाच नगरसेवकांनी व अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. निवडणूक अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
राणे यांनी वाशी येथे बैठक घेतल्यानंतर येथील पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी पुन्हा बोलविण्याचे आश्वासन दिले होते, पण ते हवेत विरून गेले आहे. नवी मुंबईतील निवडणुकांमध्ये फारसा रस नसलेल्या राणे यांना तसा येथील कोकणस्थ मतदार जवळ करणारा नसल्याचे स्पष्ट संकेत दिसून येत होते. कोकणात राणे यांना पाणी पाजणारे लाखो मतदार नवी मुंबई या कोकणाच्या वेशीवरील शहरात राहात असून त्यांचा राग अद्याप निवळलेला नाही. त्यामुळे राणे यांच्या सुभेदारीने नवी मुंबईत काँग्रेसला फटकाच बसणार होता. त्यात आता राणे यांनी तिसऱ्या बंडाची तयारी सुरू केल्याने नवी मुंबईतील लढाईतून त्यांची माघार असल्याचे निश्चित दिसून येत आहे. याच काळात माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षाची माळ पडल्याने स्थानिक नेते त्यांना भेटायला गेले होते. त्यांना दोन-चार दिवस थांबण्याचा सल्ला चव्हाण यांनी दिला आहे. चव्हाण ९ मार्च रोजी पक्षाची सूत्रे हाती घेणार आहेत. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्याचा निर्णय चव्हाण यांच्या काळात झालेला आहे. त्यामुळे त्यांचे नवी मुंबईवर बारीक लक्ष आहे. माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांच्याकडून ते येथील राजकीय घडामोडींवर गेली चार महिने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे राणे यांच्यानंतर ते स्वत: येथील निवडणुकांना समोरे जाण्याची शक्यता असून, प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. ते राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याच्या मनस्थितीत असल्याचे समजते.