नागपूर लोकसभा मतदारसंघाचा गड दोन-तीन अपवाद वगळता काँग्रेसचा उमेदवारच राखत आला असला तरी आतापर्यंत चारवेळा निवडून आलेल्या विलास मुत्तेमवार यांच्या मतांचा आलेख मात्र उतरताच आहे.
नागपूर लोकसभा मतदार संघात अनसूयाबाई काळे (१९५१ व १९५७), नरेंद्र देवघरे (१९६७), गेव्ह आवारी (१९७७), जांबुवंतराव धोटे (१९८०), बनवारीलाल पुरोहित (१९८४ व १९८९), दत्ता मेघे (१९९१), विलास मुत्तेमवार (१९९८ ते २००९) हे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. १९५१ ते २००९ या पंधरा निवडणुकीत बारावेळा काँग्रेस उमेदवार निवडून आले आहेत. १९६२ मध्ये अपक्ष, १९७१ मध्ये अ.भा. फॉरवर्ड ब्लॉक व १९९६ मध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला. अनसूयाबाई काळे, जांबुवंतराव धोटे दोनवेळा तर विलास मुत्तेमवार सलग चारवेळा निवडून आले आहेत. नागपूर लोकसभा मतदार संघात विजयी होण्यासाठी जात हा निकष कधीच राहिलेला नाही. १९७७ ते १९९१ सलग काँग्रेसचेच या मतदारसंघावर प्रभूत्व होते. १९९६ची निवडणूक काँग्रेससाठी क्लेशदायी ठरली. काँग्रेसच्या उमेदवार कुंदाताई विजयकर पराजित झाल्या. काँग्रेस सोडून भाजपात गेलेले बनवारीलाल पुरोहित निवडून आले.
त्यानंतर सोनिया गांधी यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यांनी व शरद पवार यांनी अतिशय चतुराईने रिपब्लिकन ऐक्य घडवून आणले व त्यांच्यासोबत विदर्भात काँग्रेसशी युती घडवून आणली. ती संपूर्ण विदर्भामध्ये यशस्वीपणे राबवून काँग्रेस काँग्रेस-रिपाइं युतीचे सर्व अकराही उमेदवार निवडून आणले. त्याचवेळेपासून काँग्रेसची ताकद नागपूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा प्रचंड वाढली. विलास मुत्तेमवार निवडून आले. त्यानंतर तीनवेळा ते निवडून आले. विलास मुत्तेमवार यांनी ४ जून २००९ ते १८ डिसेंबर २०१३ या दरम्यान लोकसभेत विविध ४५ विषयांवरील चर्चेत सहभाग घेतला. ६७३ प्रश्न विचारले. या काळात त्यांची लोकसभेत ८१ टक्के उपस्थिती होती.
विलास मुत्तेमवार यांना ४ लाख ८६ हजार ९२८ (१९९८), ४ लाख २४ हजार ४५० (१९९९), ३ लाख ७३ हजार ७६९ (२००४) व ३ लाख १५ हजार १४८ (२००९) अशी मते आतापर्यंत मिळाली आहेत. बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला २१ हजार ३६२ (१९९८), ५७ हजार २७ (२००४) व १ लाख १८ हजार ७४१ (२००९) मते मिळाली आहेत. १९९८ ते २००९ या काळात काँग्रेसच्या मतांची घसरण झाली असून बहुजन समाज पक्षाची मते वाढत असल्याचे यावरून स्पष्ट होते. १९९९ ते २००९ पर्यंत झालेल्या तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसचे नागपूर मतदार संघाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे काँग्रेसची मतदारांमध्ये पिछेहाट झाली, काँग्रेस उमेदवाराच्या मतांमध्ये प्रत्येक निवडणुकीत मते कमी होत गेली, असे जाणकारांना वाटते.
या तिनही निवडणुकांमध्ये प्रमुख विरोधी पक्ष भाजपचा उमेदवार हवा तसा दमदार नव्हता व म्हणूनच काँग्रेसचा विजय होत गेला. त्यामुळे आणि सुक्ष्म अभ्यासाअभावी काँग्रेस पक्ष गाफील राहिली. यंदा नितीन गडकरींच्या रुपाने भाजपने तगडा उमेदवार रिंगणात आणला आहे. याशिवाय आम आदमी पार्टीचा उमेदवार िरगणात आहे. बसपाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. गेल्या पंधरा वर्षांत काँग्रेस नेतृत्वाच्या चुकीच्या धोरणांमुळे ही काँग्रेसची पिछेहाट झाली की सतत एकच उमेदवार दिल्याने व लोकांची नाराजी आपणहून ओढवून घेतल्याने, हा काँग्रेससाठी अभ्यासाचा व संशोधनाचा विषय असल्याचे मत ‘इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ पॉलिटिकल रिसर्च अँड अॅनालिसिस’चे प्रबंध संचालक नरेंद्र जोशी यांनी व्यक्त केले आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा आलेख उतरता
नागपूर लोकसभा मतदारसंघाचा गड दोन-तीन अपवाद वगळता काँग्रेसचा उमेदवारच राखत आला असला तरी आतापर्यंत चारवेळा निवडून आलेल्या विलास मुत्तेमवार यांच्या मतांचा आलेख मात्र उतरताच आहे.
आणखी वाचा
First published on: 14-03-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress performing badly in nagpur constituency