जागांची अदलाबदल करताना हिंगोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा, या साठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार बैठकीत दिली. भाजपला पुढे करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वत:चा अजेंडा राबवत आहे. त्याला उत्तर देण्याची रणनीती आखली असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसकडून केवळ एखाद-दुसऱ्या मंत्र्यालाच लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
औरंगाबादेत ५ मार्चला राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार असून त्याबाबत आढावा घेण्यासाठी ठाकरे बुधवारी शहरात आले होते.
हिंगोलीतून राजीव सातव यांना उमेदवारी मिळावी, म्हणून हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून सोडून घेण्याचा प्रयत्न आहे. नुकताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कामाला लागा, असा संदेश दिला होता. जागा सोडण्यास राष्ट्रवादी तातडीने तयार होईल, असे चित्र नाही. दरम्यान, राहुल गांधी यांच्या दोन सभा राज्यात होणार आहेत. त्यातील एक औरंगाबादला होईल. या साठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.
नांदेडचे खासदार भास्करराव खतगावकर पाटील यांच्या उमेदवारीवरून उलट-सुलट चर्चा सुरू आहे. त्यांच्याऐवजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण निवडणूक लढवतील, असे सांगितले जाते. या बैठकीस उपस्थित असणाऱ्या खतगावकर यांना या विषयी विचारले असता ते म्हणाले की, माझी आणि अशोकरावांची बरोबरी होऊ शकत नाही. ते उभे राहणार असतील व पक्षाने तसे आदेश दिले तर काहीच हरकत नाही. मात्र, ५० हजारांपेक्षा अधिक मताधिक्क्य़ांनी निवडून आलेल्या खासदारांना उमेदवारी नाकारण्याचा अधिकार सोनिया गांधी यांना असल्याचेही खतगावकर यांनी आवर्जून सांगितले.
हिंगोलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही – माणिकराव ठाकरे
जागांची अदलाबदल करताना हिंगोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा, या साठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
First published on: 27-02-2014 at 01:45 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress persistent for hingoli seat manikrao thakare