काँग्रेसने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेवर निवडण्यासाठी बीडच्या माजी खासदार रजनी अशोक पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तब्बल १४ वर्षांच्या राजकीय विजनवासानंतर पाटील दाम्पत्याला सोनियानिष्ठेचे फळ मिळाल्याचे मानले जात आहे. पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याने जिल्ह्य़ाला आणखी एक खासदार मिळणार असून पाटील दाम्पत्याच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातारवण पसरले आहे.
बीड जिल्ह्य़ातील काँग्रेस आय पक्षाची धुरा मागील अनेक वर्षांपासून माजी मंत्री अशोक व रजनी पाटील यांच्या खांद्यावर आहे. मात्र पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणात युतीच्या काळात गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली रजनी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून खासदारकी मिळवली. १९९८ मध्ये भाजपच्या खासदार असलेल्या रजनी पाटील यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सक्रिय राजकारणात आगमन होताच भाजपाची खासदारकी सोडून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस पक्षाच्या अत्यंत बिकट काळात सोनिया गांधींच्या प्रवेशाबरोबर खासदारकी सोडून प्रवेश करणाऱ्या पाटील या एकमेव होत्या. त्यामुळे पाटील दाम्पत्याला काँग्रेसच्या काळात सत्तेची संधी मिळेल अशी अपेक्षा होती.
काँग्रेसने अशोक पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलत गेली आणि सोनिया निष्ठा असतानाही पाटील दाम्पत्य मात्र सत्तेच्या पदापासून बाजूला राहिले. काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा व केंद्रीय समाजकल्याण बोर्डाच्या अध्यक्षा म्हणून त्यांना काही वर्षे काम करण्याची संधी मिळाली. मात्र सत्तेची संधी मिळाली नाही, तरी पाटील दाम्पत्य कायम काँग्रेसच्या प्रवाहात आणि सोनिया गांधींशी थेट संपर्क ठेवून राहिले. अनेक वेळा विधान परिषदेसाठी त्यांचे नाव चर्चिले गेले पण संधी मिळाली नाही.
  विलासराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पदावर रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यामुळे तब्बल १४ वर्षांंच्या राजकीय विजनवासानंतर पाटील दाम्पत्याला निष्ठेचे फळ मिळाले, असे मानले जात आहे. जिल्ह्य़ात काँग्रेसची अवस्था बिकट आहे. एकही संस्था काँग्रेसकडे नाही. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत परळी हा एकमेव मतदारसंघ काँग्रेसच्या वाटय़ाला आहे. त्यामुळे रजनी पाटील यांना आता जिल्ह्य़ासह मराठवाडय़ातील काँग्रेसला बळकटी देण्याचे काम करावे लागणार आहे.

Story img Loader