जागावाटपाची चर्चा अद्याप अधिकृतपणे सुरू झाली नसली तरी लोकसभेच्या अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने आता दबावतंत्राचा वापर सुरू केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विदर्भात लोकसभेच्या दहा जागा असून राष्ट्रवादीने भंडारा-गोंदिया, बुलढाणा आणि अमरावती या तीन जागांवर दावा करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे जागावाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत चढाओढीला तोंड फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांपैकी १९ पेक्षा जास्त जागा राष्ट्रवादीसाठी सोडण्याची काँग्रेसची तयारी नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे. शरद पवार १९९९ साली काँग्रेसमधून फूटून बाहेर पडले होते. यानंतर दोन्ही पक्षांची आघाडी झाली. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने २६ तर राष्ट्रवादीने २२ जागांवर उमेदवार उभे केले होते. परंतु, २०१४च्या निवडणुकीत काँग्रेसची एवढय़ा जागा सोडण्याची तयारी नाही. राष्ट्रवादीने दावा केलेल्या मतदारसंघात काँग्रेसचा प्रभाव असल्याचा दावा करून या जागा राष्ट्रवादीला नाकारल्या जातील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. राष्ट्रवादीने राजकीय ताकदीच्या अंदाजावरच जागावाटपाचा निर्णय व्हावा, अशी भूमिका मांडली असतानाच पुणे जिल्ह्य़ातील धायरी येथे मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, प्रदेश काँग्रेसच्या महिला शाखाध्यक्षा कमलताई व्यवहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी रॅली घेण्यात आली. शरद पवारांचे वर्चस्व असलेल्या भागात या रॅलीचे आयोजन करून काँग्रेसने शक्तिप्रदर्शन घडविले. या रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रवादीवर दबाव वाढविण्याची खेळी काँग्रेसने खेळल्याचे समजले जात आहे.
मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी नुकताच विदर्भात दौरा केला. मुख्यमंत्री मध्यंतरी एक दिवसासाठी नागपुरात आले असताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची युती दिल्लीश्रेष्ठींच्या इच्छेनुसार कायम राहणार असल्याचे विधान केले होते. पवारांनी १४ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या दरम्यान विदर्भातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. परंतु, त्यांनी राजकीय विधान करणे टाळले. प्रत्यक्षात त्यांचा दौरा राष्ट्रवादीची विदर्भातील ताकद अजमावण्यासाठीच असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण, नवी दिल्लीत पोहोचताच त्यांनी पक्षाच्या कॅडरला निवडणुकांची तयारी करण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी पुन्हा अमरावती, बुलढाणा आणि भंडारा-गोंदिया याच तीन जागांवर राष्ट्रवादी उमेदवार उभे करणार आहे. कारण, विदर्भात राष्ट्रवादीची ताकद त्यापेक्षा मोठी नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा