सुमारे दोन दशकांपासून तत्कालीन नगरपालिका व विद्यमान महापालिकेत एकही नगरसेवक नसलेल्या काँग्रेसने वास्तवाचे कोणतेही भान न बाळगता आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे.
निवडणुकीसाठी सर्वच पक्ष व आघाडय़ांनी उमेदवारांची प्राथमिक यादी अंतिम टप्प्यात आणली असताना काँग्रेसमध्ये मात्र सामसूम होती. पक्षाचे महानगर अध्यक्ष सलीम पटेल यांनी पक्ष निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केल्यानंतर जळगावमध्ये काँग्रेसची स्थिती काय, यावर चर्चा रंगली आहे. पटेल हे पक्षाचे विद्यमान महानगर अध्यक्ष असले तरी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असताना जळगाव शहर मतदारसंघात त्यांना अनामतही वाचविता आली नव्हती. शहराच्या राजकारणात कधीही सक्रिय नसलेल्या पटेल यांना २००९ मध्ये जळगावमधून उमेदवारी मिळाली. सुरेश जैन यांच्यासारख्या बलाढय़ व्यक्तीसमोर ते उभे ठाकले. परंतु काँग्रेसच्या या उमेदवारापेक्षा अपक्ष मनोज चौधरी यांच्याशीच जैन यांचा सामना झाला. पटेल यांनी शहराच्या राजकारणात किंवा समस्या सोडविण्यात कधीच सक्रिय सहभाग नव्हता. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांचे नावही कुठे येईनासे झाले. ते थेट महानगराध्यक्ष झाल्यानंतर पुन्हा चर्चेत आले. महापालिका निवडणुकीत सर्व जागा लढण्याची त्यांची घोषणा येथे हास्यास्पद म्हटली जात असतानाच काही प्रश्नही चर्चेत आले आहेत. विधानसभा निवडणुकीत अनामतही वाचविता न आलेल्या व्यक्तीच्या हातात महापालिका निवडणुकीची सूत्रे गेल्यावर काँग्रेसला कसे यश मिळणार, असे काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
विधान परिषद सदस्य मनीष जैन यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व घेतले असले तरी आ. सुरेश जैन यांच्या प्रभावातील व्यक्ती म्हणून मनीष जैन यांची ओळख आहे. मनीष जैन यांच्या नेतृत्वातच महापालिका निवडणूक लढण्याचा पटेल यांचा प्रयत्न असल्याने काँग्रेसची फरफट सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीच्या दिशेने होईल काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

Story img Loader