माणिकराव ठाकरे यांनी हिंमत असल्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष या नात्याने लोकसभेच्या ४८ पकी २९ जागा काँग्रेसला आणि १९ जागा राष्ट्रवादीला देण्याची घोषणा करून दाखवावी, असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते आमदार संदीप बाजोरिया यांनी येथे एका वार्ताहर परिषदेत ठाकरे यांना दिले.
काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष स्वत: निर्णय घेऊ शकत नाही. त्यांना दिल्लीत हायकमांडकडे पहावे लागते. ही वस्तुस्थिती असतांना काँग्रेस २९ जागा लढवेल आणि १९ जागा राष्ट्रवादीसाठी सोडेल, अशी घोषणा ठाकरे यांनी करणे हास्यास्पद आहे, असे सांगून आमदार बाजोरिया म्हणाले, राष्ट्रवादीत शरद पवार हेच हायकमांड आहेत.  ते सांगतील तेवढय़ा जागा लढण्याची आमची तयारी आहे. राष्ट्रवादीने दिलेल्या फाम्र्युलानुसार काँग्रेस २६ आणि राष्ट्रवादी २२, असे लोकसभेचे जागा वाटप आहे. शिवाय, मतदार संघाच्या अदलाबदलीचा निर्णयही प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांचा मर्जीने होणार नाही, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.माणिकराव ठाकरे यांची इच्छा यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून लोकसभा लढण्याची असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, काँग्रेसचा पराभव काँग्रेसच करीत असते, हा इतिहास त्यांनी विसरू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ज्या डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाला ८ तारखेला भेट देणार आहेत त्या प्रकल्पाशी ठाकरे यांचा काहीही संबंध नसतांना प्रकल्पाचे श्रेय लाटण्यासाठी ते आटापिटा करीत असल्याचा आरोपही आमदार बाजोरिया यांनी केला आहे. २००६ मध्ये प्रकल्पाच्या निविदा निघाल्या तेव्हा माणिकराव ठाकरे आमदारही नव्हते. प्रकल्पाचा खर्च ४११ कोटींचा आहे. आतापर्यंत प्रकल्पावर ३०४ कोटी खर्च झाले असून, आणखी १०० कोटींची गरज आहे आणि प्रकल्प पूर्ण होण्यास १ वर्ष किमान लागणार आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
नेहरूंचे नाव बदलून पारवेकरांचे कसे देणार?
मुख्यमंत्री ज्या मार्गाला दिवंगत आमदार निलेश पारवेकर यांचे नाव देणार आहे त्या मार्गाला आधीच पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव दिलेले आहे, असा गौप्यस्फोट यावेळी नगरसेवक सुमीत बाजोरिया यांनी केला, तर नगर परिषद उपाध्यक्ष डॉ. जगदीश वाधवाणी म्हणाले, दिवंगत आमदार निलेश पारवेकर यांचे नाव देण्यासंबंधीचा ठराव हा कार्यक्रम पत्रिकेवर नसतांना मागची तारीख टाकून ठराव मंजूर झाल्याचे नगरपरिषदेच्या ३० मार्चच्या आमसभेच्या इतिवृतात दाखवले आहे. याबाबत २७ नगरसेवक तक्रार करणार आहेत. आमदार निलेश पारवेकर यांचे नाव देण्याला आमचा विरोध नाही, पण इतिवृत्तात खोटे दस्तावेज जोडून प्रस्ताव मंजूर करण्याच्या अवैध व अनतिक प्रकाराला आमचा विरोध असल्याचे नगरसेवक सुमीत बाजोरिया यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा