अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या ऐरोली विधानसभा अध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट, फुटबॉल आणि नाटय़ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सभारंभास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बराच वेळ हजेरी लावून ऐरोली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे बिगुल वाजवल्याची चर्चा नवी मुंबईत सुरू आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसची मक्तेदारी संपविण्यासाठी येथील काँग्रेसला ताकद द्या, अशी मागणी माजी महापौर रमाकांत म्हात्रे यांनी केल्यानंतर त्याला अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी प्रतिसाद दिला.अखिल भारतीय युवक काँग्रेसचे प्रातांध्यक्ष विश्वजित कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऐरोली विधानसभा अध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी एक आठवडाभर भव्य क्रीडा महात्सवाचे आयोजन केले होते. या स्पर्धाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री यांच्यासह राज्यमंत्री पी.डी. सावंत, राजेंद्र मुळक, आमदार प्रशांत ठाकूर, ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर आणि काँग्रेस नगरसेवक उपस्थित होते. नवी मुंबईत काँग्रेसची दुरावस्था झाली असल्याची बाब म्हात्रे यांनी निर्दशनास आणून दिली. प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरे कायम करण्याचा प्रश्न माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि रमाकांत म्हात्रे यांच्या प्रयत्नामुळेच आपण सोडविल्याचे चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले. काँग्रेस राज्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी करीत असून ऐरोली विधानसभा मतदार संघासाठी रमाकांत म्हात्रे यांच्या नावाचा विचार सुरू झाल्याचे संकेत चव्हाण यांनी या वेळी दिले. त्यामुळे म्हात्रे पितापुत्रांनी आयोजित केलेल्या या स्पर्धा त्या निवडणुकीची तयारी असल्याची चर्चा सुरू होती. म्हात्रे यांच्या निवडणूक प्रचारासाठी आपण पुन्हा या मतदार संघात येणार असल्याचे मुळूक आणि चव्हाण यांनी सांगितले. चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली २००९ च्या निवडणुका काँग्रेसने जिंकल्या होत्या त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवावा अशी मागणीही या मंत्रीमहोदयांनी केली. या स्पर्धा पाहण्यासाठी चांगलाच प्रक्षेक वर्ग उपस्थित होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा