काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडी संपुष्टात येण्याच्या पूर्वी काँग्रेसने ११८ उमेदवारांची नावे जाहीर केली असून त्यात विदर्भातील ३३ उमेदवारांचा समावेश आहे. मात्र, आघाडी संपुष्टात आल्यानंतर उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नसल्यामुळे विदर्भातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांंमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.
काँग्रेसमध्ये अनेकदा यादी जाहीर करून उमेदवारांचे नाव निश्चित केल्यानंतरही जोपर्यंत बी फॉर्म येत नाही तोपर्यंत नाव गुप्त ठेवले जाते हा पक्षाचा इतिहास आहे. बी फॉर्ममुळे काँग्रेसमध्ये यापूर्वी अनेकदा घोळ झाला आहे. शहरात सहा आणि जिल्ह्य़ातील दोन अशा आठ मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असली तरी उर्वरित मतदारसंघातील उमेदवारांबाबत अजूनही अनिश्चितता आहे.
काँग्रेसमध्ये पक्षश्रेष्ठींनी उमेदवारांचे नाव जाहीर केल्यानंतर ते शेवटच्या क्षणी बदलण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे अनेकदा नाव जाहीर होऊनही त्याची वाच्यता केली जात नाही. शहरात विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे, सतीश चतुर्वेदी, अभिजित वंजारी आणि नितीन राऊत यांची नावे जाहीर करण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांंमध्ये नाराजी आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षश्रेष्ठीकडे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसचे विदर्भातील अनेक इच्छुकांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असली तरी ते नेते दिल्लीत ठाण मांडून असल्याची माहिती मिळाली आहे. जोपर्यंत बी फॉर्म हाती लागत नाही तोपर्यंत उमेदवारी निश्चित नाही त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्वकुटुंबीयांनादेखील कळवण्यास त्यांना धाकधूक वाटते. त्यामुळे अधिकृत यादी जाहीर होईपर्यंत नाव निश्चित झालेला एकही इच्छुक स्वतचे नाव सांगण्यास तयार नाही. एकदा नाव बाहेर आले की, कोणत्या क्षणी ते वगळले जाईल याची शाश्वती राहात नाही. यामुळे काँग्रेसच्या इच्छुकांनी सावधगिरी बाळगत ‘अळीमिळी’चे धोरण स्वीकारून यादीत असलेल्या नावांबाबत ‘गूपचिळी’ केली.
अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवशी, सर्व  ठीक झाल्यानंतरच राजधानीतून बाहेर पडायचे  असा पवित्रा अनेक इच्छुकांनी घेतला आहे. काँग्रेसमध्ये अर्ज दाखल केल्यानंतरही पक्षाच्या उमेदवारीसाठी आवश्यक ‘बी’ फॉर्म मिळेपर्यंत काही खरे नसते. यापूर्वीही १९९५ मध्ये भाऊ मुळक यांचे नाव यादीत आले असता त्यात बदल होऊन प्रभावती ओझा यांना तर, १९९९ मध्ये राजेश तांबे यांच्या जागेवर नितीन राऊत यांना उमेदवारी देण्यात आली. २००४ च्या निवडणुकीत सावनेरमधून सुनील केदार यांच्याऐवजी चंदनसिंग रोटेले यांची लॉटरी लागली. असे अनेक कडू-गोड प्रसंग काँग्रेसजनांनी अनुभवलेले आहेत. विदर्भातील उर्वरित मतदार संघात कोणाचे नाव निश्चित झाले याबाबत सर्वानीच कानावर हात ठेवले आहेत. उर्वरित यादीतील नावांबाबत काँग्रेस वर्तुळात ‘अळीमिळी गुपचिळी’ प्रमाणे कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा