नागपूर ग्रामीण
नागपूर ग्रामीणमधील सहा जागांपैकी पाच जागांवर विजय मिळवून भाजपने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. मोदी लाटेत मतदारांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि सेनेचे विद्यमान आमदार आशिष जयस्वाल यांना नाकाराले असतानाच आशिष देशमुख आणि समीर मेघे यांना स्वीकारल्याचे दिसून येते. तसेच काँग्रेसचे पानिपत झाले असताना सुनील केदार यांनी जिल्ह्य़ात मात्र काँग्रेसची लाज राखली आहे.
२००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत ग्रामीणमधील सहा मतदारसंघापैकी उमरेड, हिंगणा आणि कामठी या तीन मतदारसंघात भाजपने विजय प्राप्त केला होता. तर रामटेक सेना, काटोल राष्ट्रवादी आणि सावनेर काँग्रेसकडे गेले होते. यावेळी सहाही मतदारसंघात कमळ फुलेल अशी भजपला आशा होती. परंतु सावनेर मतदारसंघात वेळेवर भाजपचे उमेदवार सोनबा मुसळे यांचा अर्ज रद्द झाला. तसेच पक्षाचा डमी उमेदवार नसल्याने भाजपपुढे कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असा प्रश्न निर्माण झाला. या प्रश्नाचा निर्णय घेण्यास बराच उशीर झाला. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात पडले. महाराष्ट्रात सेना-भाजपचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढत असताना निवडणूक होण्याच्या दोन दिवसाआधी भाजपने सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रचाराला अवधीच मिळाला नाही. त्यातच कुमक व आर्थिक पाठबळ नसल्याने सेनेचा उमेदवार कमजोर पडला. या संभ्रमाच्या स्थितीचा नेमका फायदा केदार यांनी उचलला. यावेळी त्यांनी काँग्रेसची डुबणारी नाव तारूण नेली. केदारांच्या विजयामुळे जिल्ह्य़ात काँग्रेसची लाज राखली आहे. नागपूर जिल्हा सहकारी बँकेतील घोटाळा व काही शाखा बंद पडल्याचा फटका केदारांना बसेल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज होता. हा अंदाजही सपशेल चुकला. गेल्यावेळी केवळ तीन हजारांनी विजयी होणारे केदार यांनी १७ हजार २०० मताधिक्य मिळवले. या विजयामुळे त्यांचे काँग्रेस पक्षात वजन वाढले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचे थोरले पुत्र आशिष देशमुख यांनी त्यांचे काका व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा पराभव करून काटोलमध्ये प्रथमच भाजपचे खाते उघडले. अनिल देशमुखांनी गेल्या पंधरा वर्षांत मतदारसंघात कोणतीच विकास कामे केली नाही, हा प्रचारच आशिषला तारुण नेण्यात मदत झाली. रणजित देशमुख यांचे कनिष्ठ पुत्र डॉ. अमोल देशमुख यांना मात्र रामटेक मतदारसंघात पराजय बघावा लागला. एकाच घरात एका मुलाच्या विजयामुळे आनंदचे आणि तर दुसऱ्या मुलाच्या पराभवामुळे निराशेचे वातावरण निर्माण होण्याचे हे आगळे-वेगळे उदाहरण बघावयास मिळाले. डी. मल्लिकार्जून रेड्डी यांनी मात्र सेनेचे आशिष जयस्वाल यांचा पराभव करून भाजपचे कमळ फुलवले. काँग्रेसचे उमेदवार सुबोध मोहिते यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले होते. असे असतानाही त्यांना पराभव बघावा लागला. उमरेडमध्ये विद्यमान आमदार सुधीर पारवे यांच्यावरच मतदारांनी पुन्हा विश्वास व्यक्त केला. पक्षातच त्यांच्याविषयी नाराजी होती. परंतु मोदी लाटेत ते तरले. त्याचप्रमाणे हिंगणा मतदारसंघातून भाजपचे समीर मेघे यांनीही कमळ फुलवले. ते बाहेरचे उमेदवार असल्याचा प्रचार विरोधकांनी केला. परंतु या प्रचाराला मतदार भुलले नसल्याचे स्पष्ट झाले. येथे माजी राज्यमंत्री राष्ट्रवादीचे रमेश बंग यांना दुसऱ्यांदा पराभव बघावा लागला. येथील सेनेचे उमेदवार प्रकाश जाधव हे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.
कामठी मतदारसंघातून विद्यमान भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांचा पराभव केला. मुळक यांना वेळेवर उमेदवारी जाहीर झाली. ते स्थानिक नसल्याने त्यांना काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवावा लागला. परंतु मोदी लाटेत त्यांचा टिकाव लागला नाही. गेली पाच वर्षे विकास कामे केल्याने बावनकुळे तरले. या मतदारसंघात तिसऱ्यांदा कोणताच उमेदवार निवडून आल्याचा इतिहास नाही. परंतु येथील उमेदवारांनी बावनकुळेवर पुन्हा विश्वास टाकल्याचे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा