देशात, राज्यात आणि अकोला महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. सर्वत्र सत्ता असताना काँग्रेस पक्षाच्या येथील स्वराज्य भवन या कार्यालयाचा गेल्या ९ वर्षांचा सुमारे ३२ हजार रुपयांचा मालमत्ता कर थकित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या २ मार्च रोजी काँग्रेसचा विभागीय मेळाव्याच्या तयारीसाठी विभागातील सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष व शहर अध्यक्ष व येथील पालकमंत्री उद्या येथे येत आहेत. या सर्वानी महापालिकेचा कर भरण्यासाठी पुढाकार घेऊन मदत करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे.
शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकासमोर काँग्रेस पक्षाचे स्वराज्य भवन हे कार्यालय आहे. महापालिकेचा गेल्या ९ वर्षांंपासूनचा मालमत्ता कर या कार्यालयाकडे थकित आहे. सुमारे ३२ हजार रुपयांचा हा कर वसुलीसाठी महापालिकेचे कर्मचारी गेल्यास स्थानिक राजकीय नेत्यांद्वारे दमदाटी होते. दमदाटीनंतर कर्मचारी आल्या पावली परत जातात. त्याचवेळी सामान्य नागरिकांनी थकित कराचा भरणा केला नाही तर त्यांच्या घराला सील करण्याची कडक कारवाई महापालिकेचे अधिकारी करतात. या सर्व प्रकारामुळे सामान्य नागरिक व राजकीय पक्षाच्या कार्यालयांना वेगवेगळा न्याय येथे महापालिकेचे अधिकारी लागू करतात.
या स्वराज्य भवन या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोरील प्रांगण आनंद मेळावा, प्रदर्शन यासाठी सुमारे १० ते २० हजार रुपये रोज या दराने भाडय़ाने दिले जाते. मिळणारे उत्पन्न प्रदेश व शहर यात विभागून घेण्यात येत असल्याची चर्चा काँग्रेस गोटात आहे. त्यामुळे भाडय़ापोटी मिळणारे उत्पन्न कुणाच्या खिशात जाते, याचा तपास प्रदेशाध्यक्षांनी घ्यावा, अशी मागणी काँग्रेस गोटातूनच आता होत आहे. इतके उत्पन्न रोज होत असताना महापालिकेचा कराचा भरणा करण्यात काँग्रेसचे पदाधिकारी इच्छूक का नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. अकोल्यातील काँग्रेस नेत्यांची एकूण संपत्ती पाहिल्यावर पक्ष कार्यालयाचा हा कर त्यांच्या समोर काहीच नाही, पण तो भरण्याची तसदी कोणी घेताना दिसत नाही. त्यामुळे महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यासाठी अकोल्याचे पालकमंत्री व शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, विभागातील आमदार, जिल्हाध्यक्ष व शहर अध्यक्षांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ही सर्व नेते मंडळी उद्या शुक्रवारी १ वाजता स्वराज्य भवनात येत आहेत. विभागीय मेळाव्याच्या तयारीसाठी त्यांचे एकत्रिकरण आहे. या सर्वांनी मालमत्ता कर भरण्यास पुढाकार घेण्याची गरज असून थोडीफार आर्थिक मदत कर भरण्यासाठी करावी, अशी मागणी गरीब व निष्ठावान काँग्रेस समर्थक करत आहेत. दरम्यान, स्वराज्य भवन या कार्यालयाचा मालमत्ता कर किती थकित आहे व हे कार्यालय सील का करण्यात येत नाही, असा प्रश्न आयुक्त दीपक चौधरी यांना विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.
काँग्रेसचा येथे २ मार्च रोजी येथे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थित विभागीय मेळावा आहे. हा मेळावा स्वराज्य भवनाच्या प्रांगणातच होणार आहे. असे असताना येथे आनंद मेळावा सुरू असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. या मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसचे पदाधिकारी शुक्रवारी स्वराज्य भवनात बैठकीसाठी येणार आहेत. त्यांच्यासमोर येथील काँग्रेसमधील अनागोंदी स्पष्टपणे आता उघड होईल, तसेच या बैठकीसाठी येणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी सढळ हाताने मदत केल्यास महापालिकेचा मालमत्ता कर अदा होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा