प्रवक्त्यांचे कानावर हात
राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणाऱ्या लोकसभेच्या सहा जागांवर काँग्रेसची नजर असल्याविषयी बैठकीत झालेल्या चर्चेवर प्रवक्त्यांनी कानावर हात ठेवले. प्रदेश काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादीकडील काही जागा काँग्रेसकडे घेण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले जाते. त्यात उत्तर महाराष्ट्रातील दिंडोरी व रावेर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या विषयी बोलताना सावंत यांनी उपरोक्त बैठक बंद दाराआड झाल्याचे सांगितले. मतदारसंघात अदलाबदल करण्याची मागणी स्थानिक पातळीवरून केली जाते. बैठकीत त्यावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. परंतु, त्याचा काही अधिकृत तपशील उपलब्ध नाही, असे ते म्हणाले.
नाशिकमध्ये परिसंवाद
‘सोशल मीडिया’वरील युध्दात भाजप अन् प्रामुख्याने नरेंद्र मोदी वरचढ ठरत असल्याने धास्तावलेल्या काँग्रेसजनांनी विरोधकांचा तितक्याच प्रभावीपणे सामना करण्यासाठी आपल्या तरूण कार्यकर्त्यांना या विषयात पारंगत करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने १८ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आयोजित ‘सोशल मीडिया’ या विषयावरील परिसंवाद हा त्याचाच एक भाग. प्रदेश काँग्रेस ‘आयटी सेल’ची स्थापना करणार असून, त्यात सकारात्मक प्रचारासाठी या प्रशिक्षित कार्यकर्त्यांचा उपयोग केला जाणार आहे.
या उपक्रमाची माहिती काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. यापूर्वी मुंबई, पुणे व ठाणे येथे या स्वरूपाचे परिसंवाद झाले असून, नाशिकनंतर औरंगाबाद व नागपूरमध्ये हा उपक्रम होईल. ‘वृध्दांचा पक्ष’ म्हणून काँग्रेसला हिणवले जाते. त्यात ‘सोशल मीडिया’चा वापर किती जण करतात, हा देखील एक प्रश्न आहे. या संदर्भात सावंत यांनी  सोशल मीडिया ही कार्यकर्त्यांसाठी नवी संकल्पना असल्याचे मान्य केले. तिच्याशी जुळवून घ्यायला काहीसा वेळ लागणार असला तरी त्याबद्दल सर्वामध्ये अप्रुप व आकर्षण आहे. आतापर्यंत झालेल्या परिसंवादात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून सर्व बाबी साकल्याने जाणून घेतल्या. काँग्रेस पक्षात युवकांची संख्या प्रचंड वाढली आहे. युवक काँग्रेसची पूर्वीची आणि आताची सदस्यसंख्या विचारात घेतल्यास ही बाब स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.
या नव माध्यमांचा देशातील तरूणांकडून मोठय़ा प्रमाणात वापर होत आहे. राजकीय पक्ष सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपला प्रभाव वाढविण्यासाठी त्याचा दुरूपयोग करत आहेत. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राष्ट्रीय एकात्मतेला छेद देण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा दुरूपयोग रोखण्यासाठी देशाला जोडणारी विचारधारा प्रभावीपणे मांडण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते त्या माध्यमांचा उपयोग करतील असा प्रशिक्षणामागील उद्देश आहे. प्रशिक्षणासाठीच्या नोंदणी अर्जात कार्यकर्त्यांना आपण ‘मीडिया सेल’साठी किती वेळ देऊ शकता, अशी विचारणा करण्यात आली आहे. विरोधकांनी व्यावसायिक संस्थांकडून या माध्यमांचा वापर चालविला आहे. त्या उलट काँग्रेस आपल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन या माध्यमावरील युद्धाचा सामना करणार असल्याचे सावंत यांनी नमूद केले. यावेळी शहराध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड उपस्थित होते.

Story img Loader