राजकीयदृष्टय़ा संवेदनशील मानल्या जाणाऱ्या व एकगठ्ठा मतदान करणाऱ्या तेली समाजापुढे यावेळच्या निवडणुकीत समाज नेता की समाजाचा दाता, असा यक्षप्रश्न उभा झाल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्य़ात कुणबी विरुद्ध तेली असेच राजकारण पिढय़ांपिढय़ापासून चालत असण्याचा इतिहास आहे. अलीकडच्या काळात या दोन प्रमुख जातींपैकी तेली समाजाने काँग्रेसला अद्दल घडविण्याहेतूने भाजपचे कमळ ठिकठिकाणी फुलविले. वर्धा मतदारसंघात सर्वाधिक नगरसेवक व जिल्हापरिषद सदस्य तसेच नगराध्यक्ष भाजपकडे असण्यात तेली समाजाचा सिंहाचा वाटा राहिला. याच पाश्र्वभूमीवर तेली समाज संघटनेचे प्रांतिक अध्यक्ष रामदास तडस यांना भाजपने रिंगणात उतरविले. वर्धा, नागपूर व पूर्व विदर्भातील दोन मतदारसंघात त्याचा लाभ मिळू शकतो हे हेरून तडसांना उमेदवारी देणाऱ्या भाजपने राज्यात प्रमुख राजकीय पक्षांपैकी केवळ भाजपने तेली समाजास उमेदवारी दिल्याचा दावा केला. तेली, मोदीवलय व शेतकरी वर्ग अशी ही गोळाबेरीज भाजपच्या विजयासाठी केल्या जाते. मात्र, तेली समाजाची भूमिका यावेळी प्रश्र नांकित झाली आहे. वर्धा जिल्ह्य़ाच्या राजकारणात पाऊल ठेवताना कुणबीवर्ग सहकारगटाकडे एकवटण्याच्या पाश्र्वभूमीवर दत्ता मेघे यांनी तेली समाजास जवळ केले. तेली समाजाचे सर्वात प्रभावी नेते प्रमोद शेंडेंचा स्वतंत्र बाणा लक्षात ठेवून मेघेंनी तडसांना सर्व ती ताकद देत दोन वेळा आमदारही केले. सोबतच माजी आमदार व्ही.यू.डायगव्हाणे व राजू तिमांडे तसेच शेखर शेंडे, प्रवीण हिवरे, आकाश शेंडे यांनाही पुढे आणण्यात मेघे कारणीभूत ठरले. त्यामुळे तेली समाजाची राजकीय वाटचाल मेघेंच्या नेतृत्वात सुरू झाली. शिवाय मेघेंच्या संस्थेत सर्वाधिक कर्मचारी तेली समाजाचेच असल्याची आकडेवारी दिल्या जाते. तडसांनी मेघेंचे बोट सोडले तरी उर्वरित नेते मात्र मेघेकडेच आहेत. पण आज समाजाच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्रांना असल्याचीही तेली समाजाची भावना आहे. तेली समाज संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले की मेघेंकडे असणारे समाजनेते हे राजकीय व आर्थिक लाभाचे धनी असल्याने त्यांचा नाईलाज समाज समजू शकतो. पण मतदार चाणाक्ष आहे. बदल हवा आहे. मेघेंप्रती समाजास सादर असला तरी आता काँग्रेसला धडा शिकविण्याच्या मानसिकतेत समाज आहे. असा खुलासा या नेत्याने केला. तसेच तडस व मोदी हे कॉम्बिनेशन विजयासाठी पुरेसे असल्याची पुष्टीही या नेत्याने केली.
वर्धा जिल्ह्य़ाच्या राजकारणात तेली समाजावर मदार ठेवून राहणाऱ्या मेघेंना पुत्र सागरच्या विजयासाठी सर्वच घटकांची मदत आता आवश्यक ठरली आहे. तेली समाजात प्राधान्य देणाऱ्या मेघेंनी कुणब्यांकडून अपेक्षा का ठेवावी? असा प्रश्रांना सातत्याने सहकार गटाकडून उपस्थित केल्या जात असतो. मात्र गटनेते आमदार प्रा. सुरेश देशमुखांनी सागर मेघेंना मनापासून समर्थन देणार असल्याची भूमिका सध्या घेतली आहे. तसेच कुणबी समाज राजकारणाचा आधार असणाऱ्या राज्यंमत्री रणजीत कांबळेंनीही मदतीत सक्रियता दाखविली आहे.
तेली व कुणबी समाजाचे असे त्रांगडे मेघेंपुढे सध्या दिसून येत आहे. मेघेंचे एक प्रचारप्रमुख व प्रदेश पदाधिकारी प्रवीण हिवरे यांनी स्पष्ट केले की, तेली समाजाचे नेते म्हणून उमेदवार झालेल्यांना समाज एकमुखी मदत करण्याची शक्यता नाही. कारण आमच्या समाजाच्या विविध गावनेत्यांना आश्वासने देऊन तडसांनी त्यांची फ सवणूक केल्याच्या जाहीर तक्रारी झाल्या. त्यामुळे मेघेंनाही समाजाची मते मिळतील, असा दावा हिवरेंनी केला. ४० टक्के कुणबी व ३५ टक्के तेली समाजाची मते असणाऱ्या या वर्धा मतदारसंघात राष्ट्रीय व राजकीय मुद्दे वेळेवर बाजूला पाडण्याचा इतिहास काही निवडणुकीतून दिसून आला. कांॅग्रेसचा पारंपरिक मतदार म्हणून ओळख झालेल्या तेली समाजास प्रमोद शेंडेंच्या अनुपस्थितीने कांॅग्रेस परकी वाटू लागली. त्यामुळे मेघेंमुळेच वर्धेचे नगराध्यक्षपद व जि.प.अध्यक्षपद मिळाल्यावरही हा समाज कांॅग्रेसअंतर्गत राजकारणाने रूष्टच राहिला, पण मेघेंच्या राजकीय वारसदाराची उमेदवारी समाजापुढे द्विधा मनस्थिती उभी करणारी ठरली आहे. समाजनेता की समाजाचा दाता, हा यक्ष प्रश्रांना त्यातूनच पुढे आल्याची त्यामुळेच चर्चा आरंभली.