कोणत्याही परिस्थितीत कुस्ती स्पर्धा होऊ देणार नाही, अशी घोषणा करणाऱ्या काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेने मंगळवारी कुस्ती स्पर्धेच्या विषयात राष्ट्रवादी काँग्रेसला छुपी साथ दिल्याची चर्चा आहे. कुस्ती स्पर्धेचा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी या पक्षांनी राष्ट्रवादीला वेगवेगळ्या मार्गानी मदत केल्याचे, तसेच या विषयात फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे बजावल्याचे स्पष्ट झाले.
राष्ट्रवादीच्या पुढाकाराने आयोजित झालेल्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेला गेला आठवडाभर सर्व पक्ष जोरदार विरोध करत होते. मात्र, या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा विषय जेव्हा मंगळवारी स्थायी समितीत आला त्या वेळी सर्वच पक्षांच्या भूमिका उघड झाल्या.  
भाजपचे विष्णू हरिहर यांनी या वेळी चक्क पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन राष्ट्रवादीला मदत केली, तर भाजपचे श्रीनाथ भिमाले आणि मनीषा घाटे यांनी प्रस्तावाच्या विरोधात
मतदान केले. पक्षाच्या भूमिकेनुसार आणि पक्षहितासाठीच हा निर्णय घेतल्याचे भिमाले यांनी पत्रकारांना सांगितले.
सावंत, शिवरकर अनुपस्थित
एवढा महत्त्वाचा व बहुचर्चित विषय स्थायी समितीसमोर आलेला असतानाही काँग्रेसच्या शीतल सावंत आणि कविता शिवरकर स्थायी समितीत अनुपस्थित होत्या. तसेच शिवसेनेचे संजय भोसले हे देखील अनुपस्थित होते. ही अनुपस्थिती योजनापूर्वकच होती, अशी उघड चर्चा महापालिकेत ऐकायला मिळाली. भाजपचे विष्णू हरिहर यांनी यापूर्वीही मुंढव्यातील आरक्षणाबाबत पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केले होते आणि ते मतदान मी नगरसेवक म्हणून नाही, तर बिल्डर म्हणून केले होते, अशा शब्दात त्यांनी समर्थनही केले होते. शिवसेनेचे संजय भोसले यांनीही कोंढवा प्रस्तावाबाबत नुकतेच पक्षविरोधात मतदान केले होते.
‘पुणेकरांचे पैसे एका पक्षासाठी दिले’
राष्ट्रवादीनेच ही स्पर्धा भरवल्याचे वातावरण तयार करण्यात आले आहे. पुणेकरांचे पैसे अशाप्रकारे एका पक्षासाठी नाहीत, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठीच मनसेचा स्पर्धेला विरोध आहे, असे नगरसेवक किशोर शिंदे आणि नीलम कुलकर्णी यांनी सांगितले.

Story img Loader