संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव करीत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. काँग्रेसने ४० जागी विजय पटकावून महापालिकेवर पाच वर्षांनी पुन्हा सत्तांतर घडवून आणत झेंडा रोवला आहे. राज्यपातळीवरील दोन्ही काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप केल्याने ही निवडणूक चांगलीच गाजली. या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट, रिपाइं आदींना घेऊन मदानात उतरलेल्या भाजपाला दोन मोहरे गमाविण्याची नामुष्की पदरी पडून दोन अंकी सदस्य संख्याही गाठता आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांच्या भूमिकेला मतदारांनी पूर्णपणे फेटाळले असून काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांच्याकडे शहराची सूत्रे सोपविली आहेत.
आज सकाळी मिरजेतील वखार महामंडळाच्या गोदामातील स्वतंत्र दोन दालनामध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला. या वेळी महापालिका आयुक्त संजय देगावकर, जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस अधीक्षक दिलीप सावंत,अपर अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांच्या उपस्थितीत मतमोजणीस प्रारंभ झाला.
दुपारी १२ वाजल्यापासून मतमोजणीचे निकाल समोर येऊ लागले. जसजसे निकाल जाहीर होतील तसतसा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. सांगली-मिरज रोडवर आणि मतमोजणी केंद्रासमोर गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.
निकाल जाहीर होताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत चतन्य निर्माण झाले होते. मिरज शहरातील लक्ष्मी मार्केट, जवाहर चौक, दत्त मदान, सांगलीतील राजवाडा चौक, महापालिका कार्यालय, भारती विद्यापीठ आदी ठिकाणी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.
तीन वर्षांनी झेंडा फडकला
माजी मंत्री मदन पाटील यांचे निवासस्थान असणाऱ्या ‘विजय’ बंगल्यावर गेल्या तीन वर्षांपासून गुलाल दिसला नव्हता. महापालिका विजयानंतर या ठिकाणी जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. प्रवेशद्वारावर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यात आला.
जिल्हा परिषदेसमोर असणाऱ्या ‘विष्णूअण्णा भवन’ येथे जल्लोष सुरु होता. तर, सख्खे शेजारी असलेल्या राष्ट्रवादी कार्यालयात मात्र शुकशुकाट दिसून आला.
शहरातील गल्लीबोळात कार्यकत्रे जोरदार घोषणाबाजी करीत मोटारसायकलवरुन फिरत होते. मोटारसायकलच्या सायलेंन्सरचा आवाज करीत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली. मतमोजणीचा निकाल जाहीर होताच सांगलवाडी येथे काही उत्साही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. शहरात अन्यत्र मात्र कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वच ठिकाणी पोलीस यंत्रणा दक्ष असल्यामुळे उत्साही कार्यकर्त्यांना चांगलाच चाप बसला.
या निवडणुकीत विजयी उमेदवारांमध्ये काँग्रेसचे प्रशांत पाटील, गुलजार पेंढारी, निर्मला जगदाळे, विजय घाडगे, कांचन कांबळे, सुरेखा कांबळे, बेबी मालगावे, सुरेश आवटी, अश्विनी कांबळे, निरंजन आवटी, शिवाजी दुर्वे,धोंडीबाई कलगुटगी, रोहिणी पाटील, संतोष पाटील, शेवंता वाघमारे, सुनीता खोत, प्रशांत पाटील, पुरुषोत्तम काकडे, पांडुरंग भिसे, वंदना कदम, दिलीप पाटील, राजेश नाईक, पद्मिनी जाधव,मृणाल पाटील, प्रदीप पाटील, हसिना नायकवडी, किशोर जामदार, बसवेश्वर सातपुते, बबिता मेंढे, संजय मेंढे,आयेशा नायकवडी, अतहर नायकवडी,विवेक कांबळे, मालन हुलवान, शकुंतला भोसले, पुष्पलता पाटील, हारुण शिकलगार, किशोर लाटणे, शालन चव्हाण आणि अलका पवार यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादीमध्ये मनगू सरगर, शेडजी मोहिते, जुबेर चौधरी, प्रार्थना मदभावीकर, अल्लाउद्दीन काजी, स्न्ोहा औंधकर, विष्णू माने, आशा िशदे, प्रियंका बंडगर, युवराज गायकवाड, झरिना बागवान, मनूद्दीन बागवान, संगीता हारगे, राजू गवळी, अंजना कुंडले, दिग्विजय सूर्यवंशी यांचा समावेश आहे.
मतदारांपुढे तिसरा पर्याय म्हणून आलेल्या भाजपप्रणीत स्वाभिमानी विकास आघाडीचे वैशाली कोरे, जगन्नाथ ठोकळे, शिवराज बोळाज, अश्विनी खंडागळे, सचिन शिरसाळे, संगीता खोत, स्वरदा केळकर, युवराज बावडेकर यांचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे.
धीरज सूर्यवंशी, अनिता अलदर, सुनीता पाटील, उमेश पाटील, सुलोचना खोत, धनपाल खोत, अनिल कुलकर्णी, स्न्ोहल सावंत, महेंद्र सावंत हे अपक्ष विजयी झाले.
प्रमुख पराभुतांमध्ये जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष मुन्ना कुरणे, माजी उपमहापौर शेखर इनामदार, माजी स्थायी समिती सभापती मकरंद देशपांडे, मावळते सभागृहातील सत्ताधारी गटाचे गटनेते किरण सूर्यवंशी यांच्यासह शेखर माने, बालाजी काटकर, रामभाऊ घोडके, तानाजी यमगर, नंदकुमार देशमुख, अजित दोरकर, शरीफा महात, अश्विनी कुलकर्णी, शीतल पाटील,महंमद मणेर, भारती दिगडे,ज्योती आदाटे आदींचा समावेश आहे.
जयंत पाटील यांचे राजकीय पार्सल इस्लामपूरला परत पाठविणार अशी आपण मतदारांना ग्वाही दिली होती. महापालिकेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांचा दारूण पराभव करीत त्यांचे पार्सल परत पाठविले आहे. भाजपला अपेक्षित यश प्राप्त झाले नसले तरीही यापुढील कालावधीत विरोधकाची भूमिका खंबीरपणे घेऊन भ्रष्टाचाराला रोखण्याचे काम केले जाईल, अशी प्रतिक्रिया आमदार संभाजी पवार यांनी दिली.
काँग्रेसचा विजय, राष्ट्रवादीचा पराभव आणि विरोधकांची पिछाडी
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव करीत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 09-07-2013 at 02:00 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conquest of congress defeat of ncp and rear of opposition