मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेची सेवा सुरू होण्यास मुहूर्त मिळत नसतानाच आता हा प्रकल्प दोन टप्प्यांत सुरू करायचा की वसरेवा ते घाटकोपपर्यंतचा पूर्ण ११.४० किलोमीटरचा मार्ग एकाच वेळी सुरू करायचा असा आणखी एक नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. वसरेवा ते विमानतळ हा पहिला टप्पा व नंतर पुढे घाटकोपपर्यंत अशा दोन टप्प्यांत मेट्रो रेल्वे सुरू करण्यापेक्षा दोन-चार महिने गेले तरी हरकत नाही पण एकाच टप्प्यात मेट्रो रेल्वे सुरू व्हावी, असा विचार ‘एमएमआरडीए’ प्रशासन करीत आहे. याबाबत अंतिम निर्णय झाला नसला तरी या नव्या ‘कल्पने’मुळे मेट्रोच्या गोंधळात आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.
मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पातील अत्याधुनिक पर्व म्हणून ‘मेट्रो रेल्वे’चा प्रकल्प सुरू झाला. पण त्याचे नियोजन आणि अंमलबजावणीचे असे काही बारा वाजले की मुंबईच्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील सावळागोंधळाचा मेट्रो रेल्वे हा एक उत्तम नमुना ठरला आहे. मुंबईतील पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या मेट्रो रेल्वे प्रकल्पाची आखणी करण्यात आली होती. वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो रेल्वे मार्गाची एकूण लांबी ११.४० किलोमीटर आहे. या प्रकल्पाचा खर्च २३५६ कोटी रुपये गृहीत धरण्यात आला होता. २००६ मध्ये या मार्गाच्या कामाची सुरुवात झाली. पण तेव्हापासून दरवर्षी प्रकल्प पूर्ण होण्याचे नवीन मुहूर्त जाहीर करायचे आणि नंतर ते बदलत मुदतवाढ देत राहायची हा खेळ ‘एमएमआरडीए’ आणि प्रकल्प उभारणाऱ्या ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’च्या अखत्यारितील ‘मुंबई मेट्रोवन प्रा. लि.’ यांनी सुरू केला. त्यामुळे आता खर्च तब्बल ४३२१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये वसरेवा ते विमानतळापर्यंतच्या टप्प्यात मेट्रोचा पहिला टप्पा सुरू केला जाईल, असे मे महिन्यातील चाचणीवेळी जाहीर करण्यात आले होते. पण आता तो मुहूर्त हुकला आहे. आतापर्यंत ९५ टक्के काम झाले आहे. पाच टक्के काम बाकी आहे. डिसेंबपर्यंत हे पाच टक्के काम पूर्ण करण्याचा ‘मुंबई मेट्रोवन’च्या अधिकाऱ्यांचा दावा आहे.
मूळ नियोजनानुसार वसरेवा ते घाटकोपर हा संपूर्ण मार्ग एकाच वेळी सुरू होणार होता. पण ‘एमएमआरडीए’ राबवत असलेल्या मोनोरेल प्रकल्पाचे काम बरेच रखडणार, असे स्पष्ट झाल्यावर प्राधिकरणाने मोनोरेल प्रकल्प चेंबूर-वडाळा आणि नंतर वडाळा ते संत गाडगेबाबा चौक अशा दोन टप्प्यांत सुरू करण्याचे जाहीर केले. त्यामुळे पहिला टप्पा सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी लोकांसाठी खुला होईल आणि प्रकल्प सुरू केल्याबद्दल पाठ थोपटून घेता येईल, अशी ‘योजना’ करण्यात आली. हे पाहताच मेट्रोचे काम करणाऱ्या ‘रिलायन्स’नेही हाच डाव टाकला. वसरेवा ते विमानतळ आणि नंतर पुढे घाटकोपपर्यंत अशी दोन टप्प्यांत मेट्रो सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले. पण पहिला टप्पा काही वेळेत सुरू झाला नाही.
मेट्रोच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याची सेवा सुरू होण्यात तीन-चार महिन्यांचा अवधी दाखवण्यात आला आहे. त्यामुळे मेट्रोसाठीचे सुरक्षा प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यासाठीही पुन्हा करावी लागेल. त्याऐवजी संपूर्ण मार्ग एकाच वेळी सुरू केला तर त्याच त्याच कामांवरील वेळ वाचेल, हा विचार करून संपूर्ण मेट्रो रेल्वे एकाच वेळी सुरू करण्याची कल्पना ‘एमएमआरडीए’प्रशासनाने पुढे आणली आहे. अर्थात त्यावर विचार सुरू आहे. पण अशा धोरणात्मक बदलांमुळे आधीच सुरू असलेल्या मेट्रोच्या गोंधळात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

Story img Loader