शेतीच्या बांधावरील भांडणात आरोपीला अटक न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या हवालदारास येथे लाचलुपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रात्री अटक केली.
पोलीस हवालदारास तक्रारदार महिलेच्या बहिणीच्या हाताने २० हजारांची लाच स्वीकारताना  सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडले. आंबेगाव येथील लहानुबाई भागुजी आव्हाड यांच्याविरुद्ध राजाराम अंधळे (रा. पाचोरे) यांनी शेताचा बांध तोडल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या संदर्भात पाटोदा येथील हवालदार भागिनाथ पेहेकर (५६) यांनी आरोपींना अटक होणे निश्चित आहे. परंतु ४० हजार रुपये दिल्यास अटक होणार नाही असे सांगितले. तडजोडअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले.  लहानुबाईची बहीण लिलाबाईकडून हवालदार पेहेकर  २० हजार रुपये स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्यास अटक केली.