शहरातील सरकारी भूखंडांवर विनापरवाना बांधकामे झालेली असून अशा जागांची बेकायदेशीर विक्री होत असल्याचा मुद्दा शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. सभापती राजू लाटकर यांनी खुल्या भूखंडावर महापालिकेचे नांव लावण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सांगून अशा जागांवरील विना परवाना बांधकामे पाडण्याची कारवाई करण्याचे आश्वासन दिले. सोमवारपासून शहरातील विनापरवाना होर्डिंग्ज काढून टाकण्याची मोहीम सुरू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.    
स्थायी समितीची सभा सभापती लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शहरातील मलनिस्सारणाची कामे,रंकाळा तलाव, अतिक्रमण, विनापरवाना होर्डिंग्ज आदी विषयांवर सभेत चर्चा झाली.    
रंकाळ्यामध्ये ऑक्सीजन बोट येणार असल्याची माहिती विचारणा सुभाष रामुगडे यांनी केली. त्याला उत्तर देतांना लाटकर म्हणाले, रंकाळा तलावासाठी आलेल्या निधीतून जी कामे सुरू आहेत त्यामध्ये बोटीचा समावेश आहे. शहरात विविध ठिकाणी मलनिस्सारणाची कामे सुरू आहेत. जेथे ही कामे झालेली नाहीत त्याचे सर्वेक्षण करून ही कामे केली जातील. शहरातील १२ नाल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे, असे त्यांनी शारंगधर देशमुख यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.    
अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्याने अतिक्रमणात वाढ झाली आहे. एखाद्या सदस्याने अतिक्रमणाची माहिती दिली तर अधिकारी त्याचे नांव सांगून वाद निर्माण करीत आहेत, असे निदर्शनास आणून देवून रामुगडे यांनी अतिक्रमणाबाबत टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला. विभागीय कार्यालय व अतिक्रमण विभाग यांनी संयुक्त मोहिम घेऊन शहरातील सर्वप्रकारची अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांना सांगण्यात आले. शारंगधर देशमुख यांनी विनापरवाना होर्डिंग्जचा, तर महेश गायकवाड यांनी खुल्या भूखंडांचा मुद्दा उपस्थित केला होता.