दिवाळीसाठी २० टक्के बोनस मिळावा, गृह बांधणीसाठी ५ लाख रूपये कर्जाऐवजी तितके अनुदान मिळावे, यासह बांधकाम कामगारांच्या अन्य मागण्यांसाठी मंगळवारी लाल बावटा कामगार संघटनेच्यावतीने सहायक कामगार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.    
बांधकाम कामगारांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटना (सिटू) यांच्यावतीने मोर्चाचे आयोजन केले होते. गांधी मैदान येथून सुरू झालेल्या मोर्चामध्ये जिल्ह्य़ाच्या विविध भागातून कामगार मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. बांधकाम कामगारांना दिवाळीला २० टक्के बोनस मिळावा, गृह बांधणीसाठी ५ लाख रूपये कर्जाऐवजी तितकी अनुदानाची रक्कम मिळावी यासहअन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे राज्यसचिव चंद्रकांत यादव, संजय दाभाडे, संघटनेचे अध्यक्ष भरमा कांबळे, सरचिटणीस शिवाजी मगदूम, शिवगोंडा खोत आदींनी केले.
 बांधकाम कामगारांना बोनस व अनुदान मिळण्यासाठी गतवर्षी ६ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. तथापि अद्यापही कामगार मंत्री व बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्याकडून बोनसबाबत कसलाही निर्णय झालेला नाही. बांधकाम कामगारांना गृह बांधणीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला होता. परंतु कामगारांना अजूनही त्याचे फॉर्म उपलब्ध झालेले नाहीत. गरीब कामगारांना गृह बांधणीसाठी कर्ज दिले तर फेडणे अशक्य होणार असल्याने पाच लाख रूपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली.    मोर्चा सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर पोहचल्यावर तेथे निदर्शने करण्यात आली. सहायक कामगार आयुक्त सुभाष कदम यांना बोनस, अनुदान, अंत्यविधी निधी, विविध योजनांचे लाभ मिळण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. मागण्यांबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
 

Story img Loader