औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सत्ताधारी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, या साठी अनेकजण दिल्लीत तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आतिक मोतीवाला यांचे नाव पुढे केले जात आहे, तर काँग्रेसमधून सुभाष झांबड, प्रमोद राठोड यांची नावे चर्चेत आहेत. सायंकाळी या अनुषंगाने बैठक होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा उमेदवार जाहीर होणे बाकी असतानाच शिवसेनेचे नेते किशनचंद तनवाणी यांनी मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालयात तीन अर्ज सादर करतेवेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, खासदार चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या राजकारणात काँग्रेसचा वरचष्मा असल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल, असा दावा केला जातो. त्यामुळे काँग्रेसने आपणास उमेदवारी द्यावी, या साठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश व शांतीगिरी महाराज यांची भेट घडवून आणण्यात पुढाकार घेणारे मुगदिया यांनी उमेदवारी मिळावी, असा दावा केला होता. याशिवाय सुभाष झांबड व मोतीवाला यांची नावेही चर्चेत होती. मात्र, उमेदवार ठरला नाही.
शिवसेनेने तनवाणी यांना उमेदवारी दिली. खासदार चंद्रकांत खैरे यांनी तनवाणींना दिलेली उमेदवारी जाहीर केली. नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी ते त्यांच्यासमवेत होते. तनवाणी यांना आशीर्वाद आहेच. त्यांना निवडून आणणे ही जबाबदारी आहे, अशा शब्दांत खैरे यांनी निवडणुकीत तयारीनिशी उतरणार असल्याचे सांगितले. नामनिर्देशनपत्र दाखल करताना शिवसैनिकांची मोठी गर्दी होती. आचारसंहितेनुसार केवळ पाच व्यक्तींनाच नामनिर्देशनपत्र दाखल करताना उपस्थित राहता येते. मात्र, सभागृहात उपस्थित शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजीमहाराजांचा जयघोष करत नामनिर्देशनपत्र दाखल केले. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, माजी मंत्री अर्जुन खोतकर आदी उपस्थित होते.

Story img Loader