पाच वर्षांपूर्वी एका रुग्णावर अपूर्ण शस्त्रक्रिया करून सेवेत कुचराई केल्याप्रकरणी जसलोक रुग्णालय आणि कर्करोग शल्यविशारद डॉ. अमिष दलाल यांना ग्राहक मंचाने दोषी धरत संबंधित रुग्णाला एक लाख १६ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
कोलकाता येथील देवप्रकाश पांडे यांच्या घशाजवळ गाठ असल्याचे वैद्यकीय चाचणीत आढळून आले. त्यानंतर जसलोक रुग्णालयात काम करणाऱ्या एका नातेवाईकाने त्यांना उपचारासाठी मुंबईत येण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सप्टेंबर २००८मध्ये ते मुंबईत आले आणि संबंधित नातेवाईकाच्या मदतीने त्यांनी जसलोक रुग्णालयात नव्याने वैद्यकीय चाचणी केली. त्यांना डॉ. दलाल यांच्याकडे पाठविण्यात आले. वैद्यकीय अहवाल पाहिल्यानंतर डॉ. दलाल यांनीही पांडे यांच्या घशाजवळ गाठ असल्याचे निदान करीत त्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. ४ सप्टेंबर २००८ रोजी पांडे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु त्यानंतरही त्यांना वेदना होत होत्या. त्यामुळे त्यांनी त्याबाबत डॉ. दलाल यांच्याकडे विचारणा केली. त्यावर ही गाठ जीवघेणी नसल्याचे सांगत तुम्ही पुन्हा कोलकात्याला परतू शकता, असा सल्ला डॉ. दलाल यांनी पांडे यांना दिला. वेदना केवळ घशापर्यंतच मर्यादित नसून त्या जीभ आणि छातीतही होत असल्याच्या आपल्या म्हणण्याची डॉ. दलाल यांनी घरी परतण्याचा सल्ला देताना दखल घेतली नाही, असा दावा पांडे यांनी मंचाकडे केलेल्या तक्रारीत केला.  
कोलकात्याला परतल्यानंतर पुन्हा एकदा पांडे यांनी वैद्यकीय चाचणी केली. त्यात गाठ पूर्णपणे काढली गेली नसल्याने वेदना होत असल्याचे आणि त्यामुळेच पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे त्यांना डॉक्टरांकडून सांगण्यात आले. ग्राहक मंचासमोर आपली बाजू मांडताना डॉ. दलाल यांनी आपण पांडे यांच्यावर करण्यात आलेल्या ‘बायोप्सी’द्वारे गाठ जीवघेणी आहे की नाही याचीच केवळ शहानिशा केली. ती पूर्णत: काढून टाकण्यात येईल, अशी हमी त्यांना दिली नव्हती, असा दावा केला. तसेच दुसरी शस्त्रक्रिया १३५ दिवसांनी करण्यात आली.
यावरून पांडे यांची प्रकृती गंभीर नसल्याकडेही डॉ. दलाल यांनी लक्ष वेधले. मात्र पांडे यांनी सादर केलेल्या ‘केसपेपर’वर गाठ पूर्णपणे काढून टाकण्यात आल्याचे नमूद केले होते. मंचाने हीच बाब विचारात घेऊन पांडे हे डॉक्टरकडे केवळ चाचण्यांसाठी आले नव्हते, असे फटकारत डॉ. दलाल यांचा दावा अमानवीय असल्याचे ताशेरे ओढले.
तसेच सेवेत कुचराई केल्याच्या आरोपाखाली रुग्णालय आणि डॉ. दलाल यांना दोषी धरत दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी आलेला एक लाख १६ हजार रुपयांचा खर्च नऊ टक्के व्याजाने पांडे यांना देण्याचे आदेश दिले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consumer court blashed on dr amish dalal because of half treatment
Show comments