सिगारेट ओढणे वा धूम्रपान करणे म्हणजे मद्यपान वा अंमलीपदार्थाचे सेवन करण्यासारखे नाही. धूम्रपान उत्तेजक पदार्थामध्येही मोडत नाही, असा स्पष्ट निर्वाळा दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक मंचाने नुकताच दिला आहे. ‘कधीतरी’ धूम्रपान करणाऱ्या नेरूळ येथील एका रहिवाशाला याच मुद्दय़ावरून वैद्यकीय विमा नाकारणाऱ्या नॅशनल इन्शुरन्स कंपनीला मंचाने या निकालाद्वारे दणका देत एक लाख रुपयांच्या विम्याची रक्कम व्याजासह द्यावी आणि वर १५ हजार रुपये न्यायालयीन खर्च द्यावा, असे आदेश दिले आहेत.
कधीतरी सिगारेट ओढत असल्यानेच नेरूळ येथील रहिवाशी असलेल्या व्ही. के. शशिकुमार यांना रक्तवाहिन्यांत गाठी होण्याचा आजार झाला, असा दावा करीत कंपनीने त्यांना वैद्यकीय विम्याची रक्कम देण्यास नकार दिला होता. मद्यपान किंवा अंमलीपदार्थ सेवनामुळे झालेल्या आजारांना कंपनीने आपल्या वैद्यकीय योजनेतून वगळल्याच्या तरतुदीचा दाखला कंपनीने शशिकुमार यांना विमा नाकारताना दिला होता.
शशिकुमार यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून वैद्यकीय विमा योजना घेतली होती. २००७ मध्ये शशिकुमार आजारी पडले आणि त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठी झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी अडीच लाख रुपये खर्च आला. विशेष म्हणजे शशिकुमार यांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच कंपनीच्या एका एजंटशी शस्त्रक्रियेबाबत चर्चामसलत केली होती. त्यानंतरही मद्यपान किंवा अंमलीपदार्थ सेवनामुळे झालेल्या आजारांना आपल्या वैद्यकीय योजनेतून वगळल्याचे सांगत कंपनीने शशिकुमार यांना वैद्यकीय विम्याची रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे शशिकुमार यांनी जुलै २००८ मध्ये ग्राहक मंचाकडे कंपनीविरोधात धाव घेतली.
आपल्याला मद्यपान वा अंमलीपदार्थाचे व्यसन नाही. तसेच आपल्याला झालेल्या आजाराचा आणि आपण कधीतरी करीत असलेल्या धूम्रपानाचा थेट संबंध नाही, असा दावा शशिकुमार यांनी तक्रारीत केला होता. त्यावर प्रतिवाद करताना दिवसाला आठ ते दहा सिगारेट ओढणे हे एकप्रकारे उत्तेजक पदार्थाचे सेवन करण्यासारखेच असून त्यामुळे बऱ्याच आजारांना निमंत्रण मिळते, असा युक्तिवाद कंपनीने केला.
सुनावणीदरम्यान, शशिकुमार यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचा अहवालही सादर करण्यात आला. त्यानुसार, तंबाखू सेवनाने नाडीसंबंधी आजार उद्भवू शकतात, असे म्हटले होते. मंचाने हा अहवाल मान्य केला. त्याचप्रमाणे कंपनीने मद्यपान वा अंमलीपदार्थाच्या सेवनामुळे झालेल्या आजारांना वैद्यकीय विमा योजनेतून वगळल्याची अट शशिकांत यांच्यासाठी लागू होत नसल्याचा निर्वाळा दिला. एवढेच नव्हे, तर शशिकांत यांना झालेला आजार हा कधीतरी केल्या जाणाऱ्या धूम्रपानामुळे झाल्याचा कंपनीचा दावाही फेटाळून लावला. उलट शशिकांत हे गेल्या ३० वर्षांपासून लघुलेखक म्हणून काम करीत असून सततच्या बसण्यामुळे त्यांना रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होण्याचा आजार झाल्याचेही मंचाने म्हटले.
ग्राहक न्यायालय म्हणते.. सिगारेट उत्तेजक पदार्थ नाही!
सिगारेट ओढणे वा धूम्रपान करणे म्हणजे मद्यपान वा अंमलीपदार्थाचे सेवन करण्यासारखे नाही. धूम्रपान उत्तेजक पदार्थामध्येही मोडत नाही, असा स्पष्ट निर्वाळा दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक मंचाने नुकताच दिला आहे.
आणखी वाचा
First published on: 24-04-2013 at 02:26 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consumer court says cigarette is not stimulant