आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर नागपूर दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांची जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन जिल्ह्य़ासाठी पूर्णवेळ देणारा संपर्क नेता तसेच लोकसभेच्या दोन्ही जागा लढण्याची मागणी केली आहे. एकीकडे आपल्या दौऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना गटबाजी संपविण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले असताना जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागण्यांवरून जिल्ह्यातील गटबाजीचेच दर्शन घडते. अंतर्गत गटबाजीमुळे काही वर्षांपासून डबघाईस गेलेल्या काँग्रेसचे स्थान जिल्ह्यात नगण्य उरलेले असताना लोकसभेच्या दोन्ही जागा लढविण्याची मागणी कोणत्या आधारावर या पदाधिकाऱ्यांनी गांधी यांच्याकडे केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जळगाव जिल्हा काँग्रेसमधील गटातटाच्या राजकारणात महानगर अध्यक्ष तसेच प्रदेश निरीक्षकाला मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. अलीकडेच झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाच्या ४८ उमेदवारांपैकी एकही निवडून येऊ शकला नाही. विशेष म्हणजे ४८ पैकी ४६ उमेदवारांना आपली अनामतही वाचविता आलेली नाही. महापालिकेच्या सलग तिसऱ्या निवडणुकीत काँग्रेसला भोपळा फोडता आलेला नाही. काँग्रेसची अशी दयनीय अवस्था असताना राहुल गांधी यांच्याकडे लोकसभेच्या दोन्ही जागा लढणे व चांगल्या संपर्क मंत्र्यांची मागणी करणे ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष उदय पाटील, महानगर अध्यक्ष सलीम पटेल यांच्यासह मोजके पदाधिकारी नागपूर येथे राहुल गांधी यांना भेटले. गांधी यांच्यासमोर या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्य़ाचा आढावा मांडला.
जिल्ह्य़ातील लोकसभेच्या दोन्ही जागा मित्र पक्षासाठी सोडण्यात आल्याने तसेच विधानसभेच्या फक्त चारच जागा काँग्रेसकडे असल्याने पक्षाची ताकद जिल्ह्य़ात कमी झाल्याचे कारण या पदाधिकाऱ्यांनी यावेळी पुढे केले. जिल्हा संपर्क नेते असलेले पद्माकर वळवी यांच्या ऐवजी जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी दुसऱ्या चांगल्या व जिल्ह्य़ाशी सतत संपर्क ठेवणाऱ्याची संपर्क मंत्री म्हणून नेमणूक करण्याची मागणी गांधी यांच्याकडे या पदाधिकाऱ्यांनी केली. जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह प्रदेश निरीक्षकाला मारहाण करण्याचे प्रकार जळगावात झाले. त्याची चौकशी केली गेली. अहवालही सादर करण्यात आला. पण संबंधितांवर कारवाई झालेली नसल्याने जिल्ह्यात गटबाजी असून शिस्तीचा अभाव असल्याची खंत यावेळी व्यक्त केली गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा