शहरातील श्रमजीवी संघटना तसेच विधायक संसद यांच्या वतीने त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि पेठ परिसरात ५ ऑगस्टपासून गाव संपर्क अभियान सुरू करण्यात आले असून ते १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
अभियानास संघटनेचे नाशिक जिल्हा समन्वयक भगवान मधे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. अभियानाच्या माध्यमातून तीन तालुक्यांतील १०५ पेक्षा अधिक गावांना भेट दिली जाणार आहे. या अभियानांतर्गत २०० कार्यकर्ते सक्रिय आहेत. अभियानात गावांतील प्रश्न, त्यांच्या अडचणी, स्थानिक लोकप्रतिनिधींचे कामकाज याबाबत माहिती घेण्यात येणार आहे. याशिवाय आदिवासी भागात स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाचा प्रचार करण्यात येणार आहे. अभियानाच्या माध्यमातून आदिवासी भागात आपले वन जमीन हक्क, अंत्योदय योजनेचा लाभ, रेशनिंग हक्क, वंचितांचे शिक्षण, शेतकरी-कातकरी, स्थलांतरित मजूर, कुपोषित मुले या सर्वाना त्यांच्या न्याय्य हक्कांविषयी माहिती देण्यात येणार आहे. अभियानात  नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.