जूनपासून सुरू झालेल्या पावसामध्ये सातत्य राहिल्याने कोल्हापूर जिल्ह्य़ात पेरण्यांना गती आली आहे. बळिराजा शेतीच्या कामामध्ये व्यग्र झाला आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत १ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हे प्रमाण ५८ टक्के इतके आहे.
चालू खरीप हंगामात भात, धूळवाफ पेरणी केलेल्या क्षेत्रावर अंतर मशागतीची कामे सुरू असून रोपलागणीचा कामे प्रगतिपथावर आहेत. जिल्ह्य़ात खरीप ज्वारी, सोयाबीन, भुईमुगाची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. आगाप पेरणी केलेल्या ठिकाणी कोळंबीची व आंतर मशागतीची कामे सुरू आहेत.
जिल्ह्य़ात खरिपाचे क्षेत्र २ लाख ९० हजार हेक्टर इतके आहे. गडहिंग्लज तालुका पेरणीमध्ये आघाडीवर असून तेथे ३७ हजार ८७६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हे प्रमाण ९१ टक्के इतके आहे. पाठोपाठ हातकणंगले(२३ हजार ५५७ हेक्टर), चंदगड (१८ हजार २४८), कागल (१६ हजार २५), आजरा (१३ हजार ३६७), भुदरगड (१२ हजार), करवीर (१२ हजार ४४८), शाहूवाडी (१० हजार), पन्हाळा (१० हजार), शिरोळ (८ हजार २५७), राधानगरी (१० हजार ५०५) इतकी पेरणी झाली आहे. आतापर्यंत जवळपास ३ मि.मी. पावसाची नोंद झालेल्या गगनबावडा तालुक्यात अवघ्या ८८० हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत.
खरीप पेरण्यामध्ये भात, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांचा समावेश आहे. पिकानिहाय पेरणी याप्रमाणे-भात ६२ हजार ११३, ज्वारी ४ हजार ६६०, नागली ५ हजार ३५०, मका १ हजार ५३५, तृणधान्य १ हजार५८८, तुरी १ हजार ३८५, मूग १ हजार २५०, उडीद १ हजार २००, इतर कडधान्ये १ हजार ७३८, भुईमूग ३७ हजार ४०६, सोयाबीन ४४ हजार ११०. अन्य भाजीपाल्यासाठी ६ हजार २१० हेक्टरवर पेरणी झाली आहे.
संततधार पावसाने कोल्हापूरमध्ये पेरण्यांना गती
जूनपासून सुरू झालेल्या पावसामध्ये सातत्य राहिल्याने जिल्ह्य़ात पेरण्यांना गती आली आहे. बळिराजा शेतीच्या कामामध्ये व्यग्र आहे. आतापर्यंत १ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
First published on: 18-07-2013 at 01:59 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Continuous rain in kolhapur