चार दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूरमध्ये पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. पश्चिमेकडील धरण भागात संततधार वृष्टी होत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्य़ात ३९ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. अजूनही चोवीस बंधारे पाण्याखाली आहेत. एकूण चोवीस मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. नदीच्या पाणीपातळीमध्ये पुन्हा वाढ होऊ लागल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.    
आषाढ महिन्यामध्ये जिल्ह्य़ात सर्वत्र चांगली पर्जन्यवृष्टी झाली. तीन आठवडे सातत्याने पाऊस पडत होता. गेली चार दिवस मात्र पावसाने उसंत घेतली होती. काल सायंकाळपासून पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. लहान व मध्यम सरी अधून मधून येत राहिल्या. शहराच्या पूर्वेकडील भागात पावसाचे प्रमाण कमी होते. पश्चिमेकडील धरणक्षेत्रात मात्र मुसळधार पाऊस सुरू होता. गगनबावडा तालुक्यामध्ये ९३ मि.मी. पावसाची नोंद झाली. याशिवाय शाहूवाडी ५१, राधानगरी ६४, आजरा ४०, चंदगड ६०, पन्हाळा ३६, कागल २१, करवीर २१ येथेही चांगला पाऊस पडला. हातकणंगले ८.३८ व शिरोळ ३.१५ येथे अजूनही पावसाने हुलकावणी दिलेली आहे. धरणातील पाणीसाठाही वाढत चाललेला आहे. राधानगरी धरणातून ४८००, वारणा धरणातून ३७०८, दुधगंगा धरणातून १८००, चित्री १५६३, घटप्रभा १२३९ घनफुट-सेंकद इतका पाण्याचा विसर्ग होत आहे. कोयना धरणातून २२८९९ तर अलमट्टीमधून २,४८,५१७ घनफुट-सेंकद विसर्ग होत आहे. राजाराम बंधाऱ्यामध्ये पंचगंगा नदीची पाणीपातळी आज ३७.४ फुट इतकी होती. या बंधाऱ्यातून ४३८२२ घनफुट सेकंद विसर्ग होत आहे. अद्यापही जिल्ह्य़ातील ३४ बंधारे पाण्याखाली आहेत. गेल्या आठवडय़ात ही संख्या ७४ पर्यंत पोहोचली होती. पावसामुळे वाहतूक यंत्रणेवरही परिणाम झालेला आहे. जिल्ह्य़ाच्या अनेक भागातील वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनधारक व प्रवाशांची चांगलीच गैरसोय झालेली आहे. एक राज्यमार्ग, १० प्रमुख जिल्हामार्ग, १० इतरमार्ग व ३ ग्रामीण मार्ग असे २४ मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत.