अल्प विश्रांतीनंतर कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रात ‘आसळका’नक्षत्राच्या पावसाने बुधवारी पहाटेपासून संततधार सुरू केली असून नदीकाठ पुराच्या भीतीने पुन्हा धास्तावला आहे. कृष्णेची पातळी ७ फुटांनी उतरली असली तरी, कण्हेर, धोम धरणातून विसर्ग वाढविल्याने पातळी पुन्हा वाढणार आहे. पुढील २४ तास कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची चढती कमान राहिली तर, विसर्ग वाढविण्याची तयारी जलसंपदा विभागाने ठेवली आहे.
सांगलीतील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी ५ वाजता संपलेल्या ८ तासात सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्वर येथे ६८ मि.मी. झाली. अन्य ठिकाणी नोंदला गेलेला पाऊस कोयना -४०, धोम-१६, कण्हेर-१४, चांदोली-२५ आणि नवजा ३५ मि.मी.
कृष्णा-वारणेच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पहाटेपासून पुन्हा जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली आहे. कोयना, चांदोली, धोम, कण्हेर आदी धरणांच्या परिसरात पडणाऱ्या संततधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद २३ हजार ४३० क्युसेक्स असला तरी पावसाची संततधार सुरू राहिल्यास गुरुवारी १० हजार क्युसेक्सने विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
धोम धरणातून बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत प्रतिसेकंद २ हजार ३०९ क्युसेक्स विसर्ग होता. तो आता ७ हजार १०५ करण्यात आला आहे. तर कण्हेर म्हणून ३ हजार १६६ असणारा विसर्ग 5 हजार ७२३ क्युसेक्स करण्यात आला आहे. तर चांदोलीतून २ हजार १७५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. कर्नाटक सीमेवर राजापूर बंधाऱ्यानजीक कृष्णा पात्रातील विसर्ग १ लाख ४९ हजार ७१५ क्युसेक्स असून अलमट्टी धरणाची पाणी पातळी ५१७.१५ मिटर आहे. अलमट्टी धरणातील पाण्याची आवक प्रतिसेकंद २ लाख ४८ हजार ५१७ असून येथील विसर्ग २ लाख ६३ हजार २७६ प्रतिसेकंद क्युसेक्स आहे.
कृष्णा नदीतील सांगलीच्या आयर्वनि पुलानजीकची पाणी पातळी गेल्या सप्ताहात ३८ फुटावर गेली होती. आता ती ३१ फुटावर आहे. मात्र धरणातील विसर्ग वाढविल्याने ३६ तासानंतर या ठिकाणची पाणीपातळी वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे. सांगली-कर्नाळ मार्गावर कृष्णेचे पाणी आल्याने बंद करण्यात आलेली वाहतूक आजच सुरू करण्यात आली होती. सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट येथील नागरिकांनी स्थलांतर केले असून महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. मात्र आज पुन्हा पाऊस सुरू झाल्याने या मोहिमेला खीळ बसली आहे.
शिराळा इस्लामपूर परिसरात आज दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. सांगली-मिरज शहरात थांबून-थांबून पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. कवठेमहांकाळ, जत, डफळापूर, उमदी परिसरात आज पाऊस झाला. आटपाडीपर्यंत पावसाने हजेरी लावली असली तरी दिघंची, राजेवाडी, पिगीवरे, पळसखेल, उंबरगाव आदी परिसरात पावसाची रिमझिम चालू होती.
सांगलीत संततधार, पुराची धास्ती
अल्प विश्रांतीनंतर कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रात ‘आसळका’नक्षत्राच्या पावसाने बुधवारी पहाटेपासून संततधार सुरू केली असून नदीकाठ पुराच्या भीतीने पुन्हा धास्तावला आहे.
First published on: 01-08-2013 at 02:03 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Continuous rain in sangli danger flood