आरोग्यास जोखमीचे ठरणाऱ्या दूषित पाण्याचा पुरवठा होत असलेली जिल्हय़ात सुमारे ७० गावे असून, गेल्या वर्षभरापासून ७ गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे धक्कादायक वास्तव सर्वेक्षणातून समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले.
जिल्हय़ात ७८७ ग्रामपंचायतींमार्फत त्या त्या गावांना व शेजारच्या खेडय़ांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, हे पाणी स्वच्छ नसल्याचे अनेक गावांत आढळून आले. जि.प. आरोग्य विभागामार्फत ३ वेळा हे सर्वेक्षण करण्यात आले. ज्या ग्रामपंचायतींना लाल कार्ड दिले गेले, याचा अर्थ त्या गावात ७० टक्क्यांपेक्षा दूषित पाणी प्यायले जाते. पिवळे कार्ड दिले, तेथे तीव्र व कमी जोखमीच्या स्रोतावर पिण्याचे पाणी अवलंबून नाही, तर ज्या ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड दिले जाते, त्यांना ७० टक्क्यांपेक्षा कमी दूषित पाणी प्यायले जात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
ज्या गावांना पाणीपुरवठा केला जातो, तो स्वच्छ व र्निजतुकीकरण करून होतो का, स्रोताभोवतालचा परिसर स्वच्छ आहे का?, स्रोतापासून १५ किलोमीटपर्यंत सांडपाणी साचते का?, स्रोताभोवती सिमेंट फरशी एक मीटरपेक्षा कमी रुंदीची आहे का?, बोअर, हातपंप, टय़ूबवेलचे सहा महिन्यांतून एकदा शुद्धीकरण केले जाते का?, मागील ३ महिन्यांपासून पाणी पिण्यास योग्य असा नमुना घेतला आहे का?, टीसीएल साठय़ातील क्लोरीनचे प्रमाण २० टक्क्.ांपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र आहे का? आदी मुद्दे सर्वेक्षणात तपासण्यात आले.
किल्लारी, रेणापूर, चिचोंडी तालुक्यांसह निलंगा तालुक्यातील कलांडी गावात गेल्या वर्षभरापासून ७० टक्क्यांपेक्षा जास्त दूषित असलेले पाणी लोक पीत असल्याचे सर्वेक्षणात समोर आले. शिवणी कोतल, आनंदवाडी व शेडोळ (तालुका निलंगा) या गावांत गेल्या एप्रिलपासून, तर बोटकूळ (तालुका निलंगा) व िशदगी (तालुका अहमदपूर), माळहिप्परगा व रावणकोळा (तालुका जळकोट) या गावांतही ३ महिन्यांपासून ७० टक्क्यांपेक्षा जास्त दूषित पाणी प्यायले जात आहे. महिनाभरात स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या सूचना जि.प.ने संबंधित ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून ७० टक्क्यांपेक्षा दूषित पाणी प्यायले जाणारे शेडोळ हे जि.प.चे माजी अध्यक्ष पंडित धुमाळ यांचे गाव आहे.
तीन सर्वेक्षणे, तीन तऱ्हा!
जिल्हय़ात नोव्हेंबर २०१२, तसेच चालू वर्षी एप्रिल व ऑक्टोबर महिन्यांत सर्वेक्षण करण्यात आले. पहिल्या सर्वेक्षणात तब्बल ५० ग्रामपंचायतींना लाल कार्ड, ३०८ ग्रामपंचायतींना पिवळे, तर ४६६ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले. दुसऱ्या सर्वेक्षणात १३ ग्रामपंचायतींना लाल कार्ड, ३०८ ग्रामपंचायतींना पिवळे, तर ४६६ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले. तिसऱ्या सर्वेक्षणात ११ ग्रामपंचायतींना लाल, २२५ ग्रामपंचायतींना पिवळे व ५५१ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.