ठाणे महापालिका प्रशासनाच्या विरोधी भूमिकेमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेच्या गुऱ्हाळात सापडलेल्या ‘समान काम, समान वेतन’ या कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेत बहुमताने मान्यता देण्यात आली. या प्रस्तावामुळे महापालिका आस्थापनेवरील कामगारांना वेतन मिळते, तेवढेच वेतन कंत्राटी कामगारांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे सुमारे दोन हजार कंत्राटी कामगारांच्या वेतनात सुमारे सात ते आठ हजार रुपयांनी वाढ होणार असून या कामगारांना यापुढे १५ हजारांच्या घरात वेतन मिळणार आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये आंनदाचे वातावरण आहे.
ठाणे, कळवा आणि मुंब्रा भागात सुमारे तीन हजार सफाई कामगारांची फौज असून त्यापैकी सुमारे दोन हजार कंत्राटी कामगार आहेत. ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील कंत्राटी कामगारांना मिळते तेवढेच वेतन मिळावे, अशी मागणी कंत्राटी कामगारांकडून पुढे आली होती. या मागणीस महापालिका प्रशासनाकडून विरोध होता. या पाश्र्वभूमीवर मध्यंतरी कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन करून ठाणेकरांना वेठीस धरले होते. त्यामुळे कंत्राटी कामगार आणि महापालिका प्रशासनातील वाद अधिकच चिघळला होता. या प्रकरणी महापालिका आस्थापनेवरील कामगारांएवढे वेतन आणि इतर सोयीसुविधा मिळत नसल्याबाबत म्युनिसिपल लेबर युनियनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान महापालिकेचे तत्कालीन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बालाजी खतगांवकर यांनी ‘समान काम समान वेतन’ देण्यासंबंधीचा प्रस्ताव सर्वसाधरण सभेपुढे मंजुरीसाठी सादर करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतरही हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला नव्हता. या प्रकरणी न्यायालयाने विचारणा केली असता येत्या सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव ठेवण्यात येईल, असे महापालिकेच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने ‘समान काम..समान वेतन’ या संबंधीचा प्रस्ताव तयार करून मागील सर्वसाधरण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. या प्रस्तावात, कंत्राटी कामगारांना समान कामाप्रमाणे समान वेतन देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यामुळे हा प्रस्ताव गेले अनेक महिने चर्चेच्या गुऱ्हाळात सापडला होता. दरम्यान, या प्रस्तावासंबंधीचा निर्णय लोकप्रतिनिधींनी घ्यावा, असे महापालिका प्रशासनाने सुचविले होते.
ठाणे महापालिकेच्या घनकचरा, कळवा रुग्णालय, शिक्षण मंडळ, मलनिस्सारण, दादोजी कोंडदेव प्रेक्षागृह, ठाणे कलादालन, नाटय़गृह, नागरी संशोधन केंद्र, स्मशानभूमी, प्रसाधनगृह साफसफाई, अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये सुमारे २०७१ कंत्राटी कामगार काम करतात. या कंत्राटी कामगारांना ७१८९ रुपये इतके वेतन मिळत होते. मात्र, या प्रस्तावामुळे कंत्राटी कामगारांना आता १५ हजार रुपये वेतन मिळणार आहे. त्यामुळे महापालिकेवर वार्षिक ३७ कोटी ४७ लाख ६८ हजार रुपयांचा बोजा पडणार आहे.

Story img Loader