सेलू येथील रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटीवर कर्मचाऱ्यांनीच औरंगाबादच्या टोळीला सुपारी देऊन दरोडा टाकण्याचा बनाव रचण्यास सांगितले होते. सहा जणांच्या या टोळीतील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संस्थेचा रोखपाल जयदीप खरातसह तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सेलू येथील या पतसंस्थेवर अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून १६ लाखांची रोकड व सोन्याचे दागिने पळविल्याची तक्रार शाखा व्यवस्थापक मारोती पवार यांनी दिली होती. परंतु पोलीस तपासात हा दरोडा कर्मचाऱ्यांनीच टाकल्याचे उघड झाले. त्यामुळे या प्रकरणात व्यवस्थापक पवार, रोखपाल खरात, लिपिक संदीप जाधव, कुलदीप मुंडे, प्रियंका िशदे व पहारेकरी पठाण यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या सर्वाची चौकशी केली असता दरोडय़ाचा देखावा समोर आला. यातील खरात, जाधव व मुंडे या तिघांना पोलिसांनी अटक केली व उर्वरित संशयितांना चौकशी करून सोडून देण्यात आले.
अटक केलेल्यांना न्यायालयासमोर हजर केले असता ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. ‘आयपीएल’मधला सट्टा हरल्याने रोखपाल खरात व इतर आíथक अडचणीत आले होते. त्यातूनच या सर्वानी पतसंस्थेलाच लुटण्याचे कारस्थान रचले. खरातने आपल्या ओळखीतील औरंगाबादच्या टोळीस दरोडय़ाचा देखावा करण्याची सुपारी दिली. टोळीतील दोघांना पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. टोळीतील उर्वरित चार जणांच्या शोधासाठी चार पथके औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत पाठविण्यात आली आहेत. या घटनेतील पळवलेली रोख रक्कम व आणखी सोने असा एक कोटीचा माल आरोपींनी दडवला. तो हस्तगत करण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहेत.
असा बळावला संशय
पतसंस्थेत दरोडा पडल्याचा देखावा केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी अर्धा तास आरडाओरड किंवा आजूबाजूच्या नागरिकांनाही याची कल्पना दिली नाही. घटना घडल्यानंतर सुरक्षा घंटाही वाजली नाही. कर्मचाऱ्यांच्या बोलण्यात विसंगती समोर आली. त्यामुळे संशयाची सुई कर्मचाऱ्यांवर गेल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Story img Loader