महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या बहिष्काराच्या पाश्र्वभूमीवर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यकक्षेत गुरूवारपासून परीक्षा सुरू होत आहेत. विद्यापीठासमोर या परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याचे आव्हान असून पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा पार पाडण्यासाठी कंत्राटी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात येणार आहे.
वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी चार फेब्रुवारीपासून प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. या पाश्र्वभूमीवर वरिष्ठ महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. जळगाव जिल्हा तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालयांनी त्यासाठी आपल्या पातळीवर तयारी सुरू केली आहे. कंत्राटी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रसंगी अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांची सेवा त्यासाठी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जळगावमधील मुळजी जेठा, नूतन मराठा, बाहेती, बेंडाळे या महाविद्यालयांचे प्राचार्य अनिल राव, आर. बी. सुरवसे, डॉ. अनिल लोहार, डॉ. एस. एस. राणे यांनी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पुरेशा मनुष्यबळाची जुळवाजुळव करण्यात येत असल्याची माहिती दिली.

Story img Loader