कचरा उचलण्यासाठी कंत्राटदाराला गेल्या सहा वर्षांत ११६ कोटींपेक्षा अधिक मलिदा खाऊ घालूनही अनेक वस्त्यांमध्ये कचऱ्याचे ढीग आणि घाणीच्या साम्राज्यात फार काही फरक पडल्याचे दिसून येत नाही.
महापालिकेने दररोज घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे आणि शहरातील संपूर्ण कचरा भांडेवाडी येथील कचराघरात पोहोचवण्याचे कंत्राट दिले आहे. कचरा जेवढा उचलला जाईल, त्याप्रमाणात रक्कम महापालिका कंत्राटाराला देत असते. उन्हाळा असो वा पावसाळा कंत्राटदाराने भांडेवाडीच्या डंम्पिंग यार्डमध्ये कचरा पोहोचवण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे साहजिकच त्या मोबदल्यात महापालिका कोटय़वधी रुपये दरवर्षी कंत्राटदाराला देत आहे. महापालिकेने ८ जानेवारी २००८ ते नोव्हेंबर २०१४ पर्यंत कचरा उचलण्याकरिता १,१६ कोटी, २६ लाख, २९ हजार, ५९१ रुपये कनक र्सिोसेस मॅनेजमेन्ट लिमिटेड या कंत्राटदार कंपनीला दिले आहेत, असा तपशील माहिती अधिकारात प्राप्त झाला आहे.
साधारणत: दिवाळीत बहुतांश घरात सफाई केली जाते. यामुळे या काळात कचऱ्यात मोठी वाढ होत असते. परंतु पावसाच्या दिवसातही मोठय़ा प्रमाणात कचऱ्याची उचल झाल्याचे दाखवण्यात आले आहे. कचरा उचलून कचरा घरात पोहोचण्याची आकडेवारी फुगवून कंत्राटदाराने आपले उखळ पांढरे केले आहे. कचरा मोजण्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले, पण ते केवळ नावापुरतेच असल्यासारखे होते. त्यातून फार काही निष्पन्न झाल्याचे दिसून येत नाही. महापालिकेकडे त्यांचे फूटेजही नाही. यामुळे खरच कचरा आला काय, पावसाच्या दिवसात येणारा ओला कचरा होता, की त्यात माती, दगडच अधिक होते, याचा सुगावा लागणे शक्य होत नाही. या कंपनीला दहा वर्षांसाठी कंत्राट देण्यात आले आहे. पहिल्या वर्षी प्रत्येक टनामागे ४४९ रुपये देण्याचे निश्चित झाले आणि त्यानंतर घाऊक दर निर्देशांक या प्रमाणे दरवर्षी ते वाढत जात आहे.
राजेश्वर ठाकरे, नागपूर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा