कल्याणमधील आधारवाडी येथील नम्रता हाइट या इमारतीच्या तळमजल्याला असलेला ५२ चौरस मीटरचा बंदिस्त गाळा वीस वर्षांच्या भाडय़ाने देण्याचा निर्णय घेतल्याने पालिकेचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. तीन वर्षांपूर्वी निविदा प्रक्रिया झालेला या गाळ्याचा प्रस्ताव तीन वर्षांनंतर महासभेत मंजुरीला आणल्याबद्दल शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी या प्रकरणात गोंधळ असल्याचे सांगून फेरनिविदा मागवण्याची मागणी केली आहे. गुरुवारच्या महासभेत या विषयावरून वादंग होणार आहेत.
विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी पालिकेने मागविलेल्या निविदेमध्ये शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनीही निविदा भरली असल्याचे पालिकेच्या कागदपत्रांवरून उघडकीला आले आहे. जमिनीचे भाव गगनाला गेलेल्या आधारवाडी भागात प्रशांत शिंदे या ठेकेदाराला २० वर्षांच्या काळासाठी दरमहा १७ हजार २५ रुपये भाडय़ाने गाळा देण्याचा प्रस्ताव गुरुवारच्या महासभेत प्रशासनाने मंजुरीला आणला आहे. तीन वर्षांच्या भाडे दरामध्ये आता कमालीची वाढ झाली आहे. मग आता जुन्या दरानेच हा गाळा का भाडय़ाने देण्यात येत आहे, असा प्रश्न नगरसेवक म्हात्रे यांनी केला आहे.

Story img Loader