वाई नगरपालिकेत ठेकेदारांचे पदाधिकाऱ्यांशी साटेलोटे झाले असून, वाई पालिकेत गैरकारभार सुरू असल्याची टीका शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी केले. वाई पाचगणी महाबळेश्वर पालिकेत नियोजनशून्य कारभार सुरू असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती करणार असल्याची माहितीही पुरुषोत्तम जाधव यांनी केली.
वाई येथे पत्रकारांशी बोलताना जाधव म्हणाले, वाई पाचगणी महाबळेश्वर पालिकांच्या नियोजनशून्य कारभाराशी आजी-माजी आमदारांना काहीही देणेघेणे नाही. सत्तेसाठी पालिका आपल्याकडे ठेवणे एवढे एकच कारण त्यांच्याकडे आहे. नागरी हिताशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. ठेकेदारांशी पदाधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे. नागरी हितापेक्षा पदाधिकाऱ्यांच्या आर्थिक हिताला महत्त्व आले असून सगळी बनवाबनवी सुरू आहे.
जाधव म्हणाले, शिल्लक असणारे फंड किरकोळ कारणे सांगून त्यांची फिरवाफिरवी सुरू आहे. पालिका फंडापेक्षा जास्त रकमेची कामे सुरू आहेत. हे असेच चालू राहिले तर पालिका कर्मचाऱ्यांचे पगार करायलाच पैसे राहणार नाहीत. जनतेला भूलथापा देण्याचे काम सुरू आहे. सतत नगरसेवकांशी वादविवाद करणारे पदाधिकारी नागरिकांना न्याय देऊ शकत नाहीत.
यासाठी पालिकेच्या कारभारावर शिवसेना लक्ष ठेवून आहे. वेळप्रसंगी आंदोलनाची भूमिका घेणार आहे आणि आमचे आंदोलन हे शिवसेना स्टाईलचे आंदोलन असेल. या वेळी त्यांनी नवीन बांधकामे, वाहतूकव्यवस्था, याशिवाय वाई खंडाळा महाबळेश्वर येथील प्रश्नांचा आढावा घेतला. आमदार पाटील सध्या फक्त खंडाळय़ाचाच दौरा करतात, तर दुसरे माजी आमदार निवडणुकीआधीच बाहेर येतील. सध्या जिल्हय़ात आमची अनुचित प्रकारांविरुद्ध व प्रस्थापितांविरुद्ध आंदोलने सुरू आहेत. या वेळी मतदारसंघाचे संपर्कप्रमुख मिलिंद घनकुटकर व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 16th Oct 2012 रोजी प्रकाशित
वाई पालिकेत पदाधिकाऱ्यांचे ठेकेदारांशी साटेलोटे- जाधव
वाई नगरपालिकेत ठेकेदारांचे पदाधिकाऱ्यांशी साटेलोटे झाले असून, वाई पालिकेत गैरकारभार सुरू असल्याची टीका शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी केले.
First published on: 16-10-2012 at 04:04 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contractors collusion with officers in wai municipal council jadhav