शहर बस वाहतुकीची कंत्राटदार कंपनी प्रसन्ना पर्पलने पुन्हा एकदा ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १ जुलैपासून सेवा बंद करण्याची नोटीसच कंपनीने आज महानगरपालिकेला दिली. दरम्यान कंपनीच्या मागणीसंदर्भात महापौर शीला शिंदे यांनी यंत्र अभियंता परिमल निकम यांना अहवाल मागितला आहे. तसेच जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनीही येत्या गुरुवारी (दि. २७) जिल्हा सुरक्षा समितीच्या बैठक बोलावली आहे.
शहर बससेवेचे व्यवस्थापक दीपक मगर यांनी आज सेवा बंद करण्याविषयीची नोटीस मनपा दिली, तसेच निवेदनही प्रसिध्दीस दिले. गेली अडीच वर्षे कंपनी शहरात ही सुविधा देत असून या काळात कंपनीच्या कुठल्याच अडचणींची मनपाने गांभीर्याने दखल घेतलेली नाही. या व्यवस्थेवर कंपनीने तब्बल सुमारे साडेतीन कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र वारंवार लक्ष वेधूनही कंपनीच्या अडचणी सोडवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
कंपनीने याआधी दोनदा सेवा बंद करण्याची नोटीस दिली होती, मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासने देण्यात आली, तसेच नागरिकांची सोय लक्षात घेऊन कंपनीने या निर्णयाची कार्यवाही केली नाही. मात्र आता प्रामुख्याने तोटय़ाचाच प्रश्न निर्माण झाला असून आता कंपनी तोटा सहन करू शकत नाही. मनपाच्या स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेतही या सेवेबद्दल कंपनीला अपेक्षित असलेले निर्णय होऊ शकले नाहीत. करारातीलच अनेक गोष्टींची पूर्तता मनपाने अजूनही केली नसून या अडचणी व त्यामुळे होणारा वाढता तोटा लक्षात घेता कंपनीने आता ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान या नोटिशीमुळे मनपात पुन्हा धावपळ सुरू झाली असून यंत्र अभियंता परिमल निकम यांना यावार अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हाधिका-यांनी याबाबत पुन्हा एकदा सर्व संबंधितांची बैठक बोलावली आहे. प्रामुख्याने बेकायदेशीर रिक्षांच्या अवैध वाहतुकीचाच शहर  बसवाहतुकीला मोठा त्रास आहे. मागच्या बैठकीत जिल्हाधिका-यांनी याबाबत आरटीओ व पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेला कडक सूचना देऊनही रिक्षांच्या अवैध वाहतुकीला आळा बसलेला नाही. तसेच एसटीने जुन्या बसस्थानकामागील जागा देण्याची तयारी दर्शवूनही ही कार्यवाही झालेली नाही, याबाबत आता ठोस कार्यवाही झाली तरच ही सेवा चालू राहील, अन्यथा ती सुरू ठेवणे आता कंपनीला शक्य नाही असे मगर यांनी सांगितले.         

Story img Loader