महापालिकेच्या विविध खात्यांमधील कामे कंत्राटी स्वरूपात करणाऱ्या सुमारे दोन हजार कामगारांच्या दिवाळी बोनसची रक्कम संबंधित ठेकेदार गायब करत असल्याची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली आहे. यंदाही कंत्राटी कामगारांना अद्याप बोनस देण्यात आलेला नसून त्यांना ही रक्कम दिवाळीपूर्वी दिली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आरपीआयचे महापालिकेतील गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी ही माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. पक्षाचे शिक्षण मंडळ सदस्य बाळासाहेब जानराव हेही यावेळी उपस्थित होते. महापालिकेच्या पथ, उद्यान, आरोग्य, विद्युत, घनकचरा, पाणीपुरवठा आदी खात्यांमधील कामांसाठी कंत्राटी कामगारांची नियुक्ती ठेकेदारांमार्फत केली जाते. विविध खात्यांमध्ये असे दोन हजार कामगार कंत्राटी म्हणून काम करत आहेत. यातील बहुतांश कामगार स्वच्छतेसह इतर सोयी-सुविधा पुरवण्याची कामे करतात.
या कामगारांना संबंधित ठेकेदाराने दिवाळी बोनस देणे
कायद्याने बंधनकारक असतानाही ठेकेदार ही रक्कम कामगारांना देत नाहीत, अशी माहिती डॉ. धेंडे यांनी दिली.
महापालिका ठेकेदारांबरोबर करार करते, त्यावेळी ठेकेदाराने कामगारांना बोनस देण्याची अट करारात समाविष्ट असते. तसेच या कामगारांच्या बोनसची रक्कम महापालिका ठेकेदारांना देते. मात्र, महापालिकेने दिलेली ही रक्कम ठेकेदार त्यांच्याकडील कामगारांना देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तशा अनेक तक्रारी कामगारांकडून आल्या आहेत, असेही डॉ. धेंडे म्हणाले. या प्रकाराची दखल घेऊन कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस मिळेल असे आदेश द्यावेत. तसेच हे पैसे तूर्त महापालिकेने कामगारांना द्यावेत आणि नंतर ते ठेकेदाराच्या अनामत रकमेतून वसूल करावेत, अशीही मागणी आरपीआयतर्फे करण्यात आली आहे.    

Story img Loader