स्वामी विवेकानंद यांची येत्या शनिवारपासून (दि. १२) १५० वे जयंती वर्ष अर्थात सार्धशती समारोह वर्ष विवेकानंद केंद्र (कन्याकुमारी) साजरे केले जात आहे. जयंती वर्षांनिमित्तचे कार्यक्रम केवळ कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्रामध्येच साजरे होत नसून, ते संपूर्ण देशभर साजरे होत आहेत. त्यासाठी समाजातील सेवाभावी संस्था व व्यक्ती तसेच शासन यांच्या समन्वयातून हे कार्यक्रम होणार आहेत. तरी सेवाभावी संस्था व्यक्ती तसेच प्रसारमाध्यमांनीही त्यात आपले योगदान द्यावे असे असे आवाहन कराड येथील सार्धशती समारोह समितीचे प्रदीप वाळिंबे यांनी केले आहे.  
वाळिंबे म्हणाले, की १२ जानेवारी २०१३ विवेकानंदांचे १५० वे जयंती वर्ष – स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह वर्ष म्हणून विवेकानंद केंद्र साजरे करीत आहे. आज भारत सर्वात प्राचीन संस्कृतीसह अधिकतम तरुणांची लोकसंख्या असलेला देश आहे. भारतीय तरुण सुशिक्षित, संपन्न आणि गंभीर आहे. हा तरुण वर्ग आपला देश, आपला इतिहास-आपल्या संस्कृतीसंबंधी जास्तीत जास्त जाणून घेऊ इच्छितात आणि अंत:करणपूर्वक देशाची सेवा करू इच्छितात. स्वामी विवेकानंदांच्या आवाहनाने लाखो हृदयांना स्वामी विवेकानंदांनी पाहिले, की भारतीय इतिहासाच्या अंधकारमय काळातही प्राचीन भारताचे जगाकडून जगद्गुरूच्या रूपात पूजन केले जात असे. समकालीन जग भौतिक संपन्नता तसेच आध्यात्मिक जागरणातून स्पष्ट लक्ष मिळवू इच्छिते. परंतु या जगाला श्रेष्ठ आणि उदात्त विचारांचा जर स्पर्श झाला नाही, तर ते जग आपल्या मार्गाबाहेर भटकत राहील, म्हणून जगाला प्रकाश देण्याच्या हेतूने भारताला पथदर्शकाचे काम करावेच लागेल. भारतासाठी स्वामी विवेकानंदांची १५० वी जयंती ही फार मोठी संधी आहे, की ज्यायोगे त्याने आपली जबाबदारी ओळखून स्वामी विवेकानंदांचे स्वप्न, की ‘भारत हा अखिल विश्वाच्या जगद्गुरूपदी विराजमान होईल’ साकार करण्याची हीच ती संधी आहे. तरी आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवू शकतात अशा स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी साजरे होणाऱ्या सार्धशती समारोह वर्षांतील कार्यक्रमांचा आवर्जून लाभ घ्यावा. असे आवाहन प्रदीप वाळिंबे यांनी केले आहे.