ठाणे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी (एसईओ) नियुक्ती करण्यासंबंधी एक यादी पालकमंत्र्यांपुढे सादर करण्यात आली होती. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांची वर्णी लावताना राष्ट्रवादीचे मंत्री हात आखडता घेतात, असा जाहीर आरोप मनोज शिंदे यांनी या वेळी केला. एसईओपदी ठाण्यात काही शिवसैनिकांची वर्णी लावण्यात आली; परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांना ठेंगा दाखविण्यात आला, असा आरोप शिंदे  यांनी करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राजकीय कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या शासकीय समित्यांवर नेमणुका केल्या जातात. रेशिनिंग कमिटी, जेल समिती यांसारख्या समित्यांवर काँग्रेस कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली नाही, याविषयी या वेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. काँग्रेस पक्षाची ज्या प्रभागात ताकद आहे, तेथे लोकसभा निवडणुकीसाठी कार्यालये उघडून राष्ट्रवादीचे नेते स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करीत असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला.
महापालिकेतील नाराजी चव्हाटय़ावर
दरम्यान, या बैठकीत नवी मुंबईतील पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असून तेथे काँग्रेसचे नगरसेवक विरोधी पक्षात आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रभागातील ठराव फेटाळणे, त्यांना सभागृहात बोलू न देणे यांसारख्या तक्रारी असून या तक्रारींचा पाढाच या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विखे-पाटील यांच्यापुढे वाचला. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत राष्ट्रवादीवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा रंगली असून ही नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीच्या नेत्यांना आगामी काळात पेलावे लागणार आहे.

Story img Loader