‘मरे नेहमी रडे’ हा बदलौकिक खोटा ठरेल, अशी सुविधा ठाणेपल्याडच्या उपनगरी प्रवाशांना देण्याची रेल्वे प्रशासनाची योजना असून त्याची चुणूक २०१४ मध्ये काही प्रमाणात दिसणार आहे.
ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर अगदी कर्जत आणि कसाऱ्यापर्यंतच्या प्रवाशांना नववर्षांनिमित्ताने मध्य रेल्वेच्या वतीने विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नव्या सुविधांची भेट दिली जाणार आहे. मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांमुळे यंदाच्या वर्षी या भागातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
पाच वर्षांपूर्वी जर्मन बनावटीच्या सीमेन्स कंपनीच्या हवेशीर लोकल गाडय़ा मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्या होत्या. हवेशीर मोकळी जागा, स्टेनलेस स्टीलची चकचकीत बांधणी, गाडीत उद्घोषणेची सुविधा, इंडिकेटर्सची व्यवस्था या सर्व गोष्टींमुळे ही लोकल प्रवाशांमध्ये लगेच लोकप्रिय झाली. त्यानंतर या लोकल्सची संख्या वाढत गेली असली तरी अनेक जुन्या लोकल्सही धावत होत्या. नवी रंगरंगोटी केलेल्या या जुन्या लोकल्समधून प्रवाशांना प्रवास करावा लागत होता. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने प्रवाशांची ही व्यथा लक्षात घेतली असून जर्मनीतील बम्बार्डियर कंपनीची बनावट असलेल्या ७० लोकल गाडय़ा २०१४ मध्ये मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहेत. त्यापैकी ४० लोकल्स मध्य रेल्वेच्या प्रवाशांना उपलब्ध होऊ शकणार असून दिवाळीपर्यंत या लोकल्स मध्य रेल्वेच्या मार्गावरून धावतील, असे रेल्वेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या पश्चिम रेल्वेमध्ये त्यापैकी एक लोकल दाखल झाली असून तिचे प्रवाशांनी स्वागत केले आहे. हवेशीर वातावरण, मेट्रोप्रमाणे आसन व्यवस्था, आकर्षक हँडल्स, आणि स्वच्छतेसाठी उपयुक्त रंग असे या लोकल्सचे वैशिष्टय़ असणार आहे.
पाच आणि सहाव्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होणार..
सध्या अस्तित्वात असलेल्या चार मार्गामुळे लांब पल्ल्यांच्या गाडय़ा, मालगाडय़ा आणि लोकलचे वेळापत्रक सुरळीत राखणे मध्य रेल्वेसाठी जिकिरीचे जात असून २००९ साली पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून २०१४ मध्ये हे दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग वापरात येऊ शकणार आहेत. ठाणे-कुर्ला दरम्यान सहा रेल्वे मार्ग सुरू असून वर्षभरामध्ये कुर्ला ते कल्याण लांब पल्ल्यासाठी दोन स्वतंत्र रेल्वे मार्ग उपलब्ध होऊ शकणार आहेत. त्यामुळे रेल्वेची रखडपट्टी निश्चित थांबणार आहे. शिवाय नव्या लोकलसाठी वेळापत्रक सुधारणे शक्य होऊ शकणार आहे, असे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के.सिंग यांनी सांगितले.
कल्याण-वाशीच्या प्रकल्पाचा शुभारंभ..
कल्याणमधून नवी मुंबईमध्ये जाण्यासाठी कल्याण-वाशी या रेल्वेमार्गाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ २०१४ मध्ये होणार असून सुमारे चार वर्षे हे काम सुरू राहणार असून २०१८ मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येणार आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली आणि त्या पलीकडच्या लोकांना यामुळे ठाण्याचा वळसा टाळणे शक्य होईल, अशी माहिती खासदार आनंद परांजपे यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना दिली.
दृष्टिक्षेपातील प्रकल्प..
नव्या वेळापत्रकामध्ये दहा लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. उंबरमाळी तानशेत स्थानकातील लोकलच्या फलाटांचे काम सुरू करण्यात आले असून लवकर या भागामध्ये एटीव्हीएम मशीनच्या माध्यमातून तिकीट आणि पास सेवाही सुरू करण्यात येणार आहेत. अंबरनाथ आणि बदलापूर येथील पादचारी पुलांची कामे सुरू आहेत. त्यापैकी दीर्घकाळ रखडलेल्या बदलापूरच्या पादचारी पुलाचे काम या वर्षी पूर्ण होऊन बदलापूरकरांना दिलासा मिळणार आहे. या पादचारी पुलामुळे शहराच्या पूर्व तसेच पश्चिम दोन्ही बाजूंचे स्कायवॉक जोडले जाऊन रेल्वे स्थानक परिसरात होणारी गर्दी काही प्रमाणात टळेल. डोंबिवलीमध्ये आणखी एक नवा सरकता जिना प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होऊ शकेल, असे रेल्वेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
केवळ भिंतीवरील कॅलेंडरच बदलून बाकी सारे ‘जैसे थे’च राहणार असेल तर नवीन वर्ष या संकल्पनेला तसा फारसा अर्थ उरत नाही. त्यामुळेच गेल्या वर्षीपेक्षा ठाणे जिल्ह्य़ात यंदा काय काय नवे येईल, याचा त्रोटक आढावा घेण्याचा हा प्रयत्न. मध्य रेल्वेचा उपनगरी रेल्वे प्रवास दिवसेंदिवस अधिकाधिक जिकिरीचा आणि कष्टाचा होऊ लागलेला असतानाच चालू वर्षांत तो काहीसा सुखद होण्याची चिन्हे आहेत. रस्त्यांचा जणू काही अविभाज्य घटक असणाऱ्या खड्डय़ांना कायमची मूठमाती देण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केल्याने ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखदायक होईल, अशी आशा करायला हरकत नाही. तुलनेने तरुण असणाऱ्या चाळिशीतल्या नवी मुंबईत लहान-मोठे १४ प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहेत. त्यापैकी काही प्रकल्प यंदा पूर्ण होऊन या शहराच्या वैशिष्टय़ात भर पडणार आहे. ठाणे जिल्ह्य़ात या वर्षी सर्वात मोठे आकर्षण ठरेल ती म्हणजे फ्युनिक्युलर रेल. अंबरनाथ तालुक्यातील मलंग गडावर साकारीत असलेला हा या पद्धतीचा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि भाविकांची सोय होईलच, शिवाय पर्यटकांचाही ओघ वाढेल.
रेल्वे प्रवास अधिक सोयीचा!
‘मरे नेहमी रडे' हा बदलौकिक खोटा ठरेल, अशी सुविधा ठाणेपल्याडच्या उपनगरी प्रवाशांना देण्याची रेल्वे प्रशासनाची योजना असून त्याची चुणूक २०१४ मध्ये काही प्रमाणात दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 01-01-2014 at 09:32 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Convenient railway journey in new year