काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पाटण तालुक्यामध्ये झालेल्या विकासकामांचे श्रेय कोणीही घेऊ नये असे बजावताना, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होत असलेल्या विकासकामांची आणि शेतक-यांच्या विकासासाठी राबवलेल्या ठोस निर्णयाची माहिती पोचवावी, असे आवाहन काँगेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी केले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून कार्यभार साधल्याचा विश्वास त्यांनी दिला.
ढेबेवाडी (ता. पाटण) येथे आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात ते बोलत होते. पाटण अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील होते. काँग्रेसचे जिल्हा संघटक राहुल चव्हाण, पाटण तालुकाध्यक्ष राजाराम पाटील, युवक  काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अभिजित पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रवीण पाटील, पाटण पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर पाटील, जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी पाटील, पंचायत समिती सदस्या सुनंदा पाटील आदी मान्यवरांची मेळाव्यास उपस्थिती होती. विधिमंडळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे आमदार प्रवीण दरेकर यांच्या निषेधाचा ठराव पाटण तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने मधुकर पाटील यांनी मांडला. तो टाळय़ांच्या गजरात मंजूर करण्यात आला.
हिंदूराव पाटील म्हणाले, की पाटण तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दोनशे कोटींची विकासकामे झाली आहेत. त्यामध्यील अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. ती कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी यशस्वीपणे प्रयत्न केले पाहिजेत. आज पाटण तालुक्यामध्ये काँग्रेसच्या रूपाने तिसरा सक्षम पर्याय निर्माण होत असून कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे खंबीर नेतृत्व आपल्या पाठीशी आहे. तालुक्याच्या विकासासाठी बाबांची नेहमी मदत होणार आहे. कोणत्याही श्रेयवादामध्ये न अडकता सर्वसामान्य जनतेच्या कामाला त्यांनी महत्त्व दिले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने उच्च विद्याविभूषित, चारित्र्यसंपन्न व कार्यशील नेतृत्व आपल्या राज्याला लाभले आहे. त्यामुळे आपण तालुक्यात काँग्रेस पक्षाची मजबूत संघटना बांधून बाबांना आपल्या तालुक्याची ताकद देऊया, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
राहुल चव्हाण म्हणाले, की पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून पाटण तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये काँग्रेस पक्षाची मजबूत फळी निर्माण करूया. प्रत्येक गाव, वाडी-वस्तीमध्ये विकासकामे पोहोचवूया, विकासकामे मांडायला आपण कमी पाडतोय, यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. विरोधक काम कमी, पण विकास कामाचा प्रचार मोठा करतात, त्यास सर्वसामान्य जनतेने बळी पडू नये यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सतर्क रहावे असे आवाहन त्यांनी केले.

Story img Loader