गेल्या दशकभरात मराठवाडय़ात चुलीत लाकूडफाटा जाळणे कमी झाले आहे. २००१ मध्ये ६५.१ ते ७३.३ टक्के महिला स्वयंपाक लाकूडफाटा जाळून करीत. बदलाचा वेग वाढत गेला तशी स्वयंपाक करण्याची साधनेही बदलत गेल्याची निरीक्षणे जनगणनेच्या आकडेवारीत करण्यात आली. लाकूडफाटा बंद झाल्यामुळे गॅसवर स्वयंपाक करणाऱ्यांची संख्या वाढली. २००१ मध्ये किमान ५.४ टक्के ते कमाल ९.३ टक्के गॅसवर स्वयंपाक करण्याचे प्रमाण होते. या जनगणनेत ही आकडेवारी १४ ते ३३ टक्के एवढी वाढली आहे. औरंगाबाद शहरात गॅसवर स्वयंपाक करण्याचे प्रमाण ३३.४ टक्के असल्याचे जनगणनेच्या पाहणीत आढळून आले.
मराठवाडा तसा अविकसित प्रांत. शेतातून येताना लाकूडफाटा जळणासाठी घेऊन येणे हे ग्रामीण भागातील महिलेचे महत्त्वाचे काम असे. धुरामुळे होणारा त्रास व महिलांच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी निर्धूर चुलीचा प्रचारही मोठय़ा जोमात होता. जळणासाठी लाकूडफाटा गोळा केला नाही, तर तुराटय़ा-पराटय़ा, भुस्सा याचा वापर जळण म्हणून केला जात असे. या जनगणनेच्या आकडेवारीत स्वयंपाकासाठी पिकांपासून निघालेला भुस्सा आणि तुराटय़ांचा वापर अधिक वाढल्याची नोंदही झाली आहे. मराठवाडय़ात परभणी, जालना आणि बीड येथे हे प्रमाण अधिक आहे.
जनावरांच्या शेणापासून होणाऱ्या गोवऱ्यांचा जळण म्हणून होणारा उपयोग मात्र कमी झाल्याचे निरीक्षण आकडेवारीनिहाय जनगणनेत पाहावयास मिळू शकते. स्वयंपाकाच्या बदलत्या सवयी आणि त्याचा विभागनिहाय अहवाल ग्रामीण भागातील महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष वेधत आहे. विशेष म्हणजे या जनगणनेत केरोसिनवर स्वयंपाक करणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे.
दशकात एलपीजी वापरणाऱ्यांची
जिल्हानिहाय बदललेली संख्या :
नांदेड २००१ (९.३)/२०११(१७.७)
हिंगोली २००१(५.५)/२०११(१२.२)
परभणी २००१(८.८)/२०११(१६.५)
जालना २००१(८.४)/२०११(१५.५)
औरंगाबाद २००१(२०.८)/२०११(३३.४)
बीड २००१(८.८)/२०११(१५.१)
लातूर २००१(१०)/२०११(२०.३)
उस्मानाबाद २००१(५.४)/२०११(१४.१)

Story img Loader